सातारा: नमो पर्यटन सुविधा केंद्र ही राज्याच्या पर्यटनाला बळ देणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे या योजनेवर राजकीय हेतूने टीका करत आहेत. मुंबई महापालिकेतील मलिदा समोर दिसत असल्याने ठाकरे बंधू एकत्र आले आहेत.मात्र मुंबईकर जनता त्यांचा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नाही अशी टीका साताऱ्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नमो पर्यटन योजनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका करत गडांजवळ नमो केंद्र उभे केल्यास फोडण्याचा इशारा दिला आहे. याचा संदर्भ घेत देसाई म्हणाले, की राज ठाकरे यांनी नमो योजनेची पूर्णता माहिती घ्यावी. नमो केंद्र ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेली योजना आहे. ही पर्यटन सुविधा केंद्र नागरिकांच्या सुविधेसाठी गडांच्या पायथ्याला बांधण्यात येणार आहे. यासंदर्भातील आराखडा येत्या सोमवारी होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत सादर करून त्याला मान्यता घेतली जाणार आहे. जे सत्तेत नाहीत असे विरोधक राजकीय हेतूनेच या योजनेवर टीका करत आहेत.

दरम्यान राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या टिकेचाही शंभूराज देसाई यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, की महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेने भाजपचे नेतृत्व मान्य केले हा एकनाथ शिंदेंच्या मनाचा मोठेपणा आहे. त्यांनी लाडकी बहीण योजना यशस्वी करून दाखवली. जे राज ठाकरे लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोंड भरून स्तुती करत होते, तेच राज ठाकरे आज महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या ‘नमो योजने’वर टीका करत आहेत. हा राजकीय दांभिकपणा मुंबईकर जनता पाहून आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोन्ही नेते मुंबई महानगरपालिकेतील पैसे लुटण्यासाठी एकत्र आले आहेत. मात्र मुंबईची जनता अत्यंत सुज्ञ आहे.त्यांचा हा डाव जनता यशस्वी होऊ देणार नाही.मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा निश्चित फडकणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, काँग्रेसने छत्रपती शिवरायांचा उपमर्द केला. याच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी साताऱ्यातील छत्रपतीच्या वारसदारांना ते छत्रपतींचे वारस असल्याचे पुरावे मागितले होते. तेव्हा राज ठाकरे यांनी कोणतीही विरोधात भूमिका घेतली नाही. आत्ताच नरेंद्र मोदी पर्यटन सुविधा केंद्रावर त्यांनी टीका करायचे कारणच काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

नमो पर्यटन केंद्र म्हणजे प्रत्येक गडाच्या पायथ्याला वीस गुंठे जागेमध्ये पुरुष व महिलांसाठी विश्रांती कक्ष बांधली जाणार आहेत. यामध्ये अपंगांसाठी विशेष सोय केली जाणार आहे. पर्यटकांना ऐतिहासिक स्थळांवर सुविधा मिळत नाहीत हे डोळ्यासमोर ठेवूनच या योजनेची आखणी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारताच्या राजकारणातील आणि जागतिक पातळीवर भारताची ओळख निर्माण करण्यामध्ये मोठी भूमिका आहे. त्यांच्या नावाने जर योजना कार्यान्वित झाली तर हरकत काय असा सवाल त्यांनी केला. राज ठाकरे यांची तोडफोडीची भाषा अत्यंत दुर्दैवी आहे. राज्य शासन सुद्धा या संदर्भात योग्य ती भूमिका घेईलच असा इशारा त्यांनी दिला.

अतिवृष्टी राज्यात झाल्याने खरीप हंगामाचा सुद्धा पेरा वाया गेला आहे. ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तसेच ज्यांचे पंचनामे सदोष झाले आहेत अशा शेतकऱ्यांच्या विषयावर बोलताना शंभूराजे म्हणाले, राज्य शासनाने एक उच्चस्तरीय समितीचा अहवाल करण्याच्या सूचना देऊन ३० जून २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाही ते पंचनामे सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत घेऊन त्या संदर्भातील विषय कॅबिनेट समोर आणण्यात येऊन त्याला मंजुरी घेतली जाईल. .यासंदर्भात मी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याशी मी बोललो आहे. त्यांनी राज्यातील पंधराशे कोटी रुपयांचे अनुदान वाटप केलेले आहे.सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत नुकसानीचे अनुदान हे निश्चितच पोहोचवले जाईल अशी ग्वाही शंभूराज देसाई यांनी दिली.