Shambhuraj Desai : आज विधान परिषदेच्या सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाला अनिल परब विरुद्ध शंभूराज देसाई यांचा सामना रंगल्याचं पाहण्यास मिळालं. या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. चिडलेल्या अनिल परब यांनी शंभूराज देसाईंना गद्दार असं संबोधलं. ज्यानंतर शंभूराज देसाईंनी गद्दार कुणाला म्हणतो रे? बाहेर भेट मी बघतो असं करत अनिल परब यांना ललकारलं होतं. हा वाद इतका वाढला की विधान परिषदेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करावं लागलं. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या वादातले आक्षेपार्ह शब्द रेकॉर्डवरुन काढून टाकत असल्याचं जाहीर केलं. दरम्यान माध्यमांशी बोलत असताना शंभूराज देसाईंनी सभागृहात काय घडलं ते सांगितलं.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी नेमकं काय सांगितलं?

शंभूराज देसाई म्हणाले, “विधान परिषदेच्या सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाला मिलिंद नार्वेकर यांनी एक प्रश्न विचारला होता. मराठी माणसाला घरं उपलब्ध करुन देण्यासंबंधीची ही चर्चा होती. मी दिलेल्या उत्तराने काही अंशी मिलिंद नार्वेकर हे समाधानी होते. उपप्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला. चित्रा वाघ म्हणाल्या या पूर्वीच्या सरकारमध्ये असं धोरण होतं का? ज्यावर उत्तर देताना मी सांगितलं यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठी भाषिक लोकांच्या घरांसंदर्भातलं धोरण आणलं नव्हतं. मी उद्धव ठाकरेंचा उल्लेख केल्यानंतर अनिल परब यांना राग आला आणि ते जोरजोरात तुम्ही पण मंत्री होतात, तुम्ही का बोलला नाहीत? हे विचारु लागले. मी त्यांना म्हणालो तुम्ही तर कॅबिनेट मंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या जवळचे होतात मग तुम्ही का बोलला नाहीत. आम्ही हे बोलत असताना अनिल परब यांनी तुम्ही तर गद्दारी करत होतात, असं शब्द वापरला. मी त्यामुळे त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं की तुम्ही तिथे काय चाटायचा प्रयत्न करत होतात? आम्हाला गद्दार शब्द वापरल्यानंतर वाद झाला. त्यानंतर बाचाबाची झाली.”

नीलम गोऱ्हे यांनी वाद झालेलं भाष्य रेकॉर्डवरुन काढलं-देसाई

विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताईंनी जे योग्य वाटलं नाही ते भाष्य काढून टाकण्याचे आदेश दिले. मात्र मी सांगू इच्छितो की आम्हीही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. आम्ही तीन लाख लोकांनी निवडून आलेले लोक आहेत. आम्हाला मोठ्या आवाजात कुणी बोलेल, अपमान करेल, सभागृहात बदनामी करेल तर कुणीही असला तरीही आम्ही सहन करणार नाही. असं देसाईंनी माध्यमांना सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांनी जर वाद वाढवला तर आम्ही…

आता वाद संपला आहे का? असं विचारलं असता शंभूराज देसाई म्हणाले, “ते अरे कारे करु लागले मी पण तशीच भाषा वापरली. अनिल परब बघतो म्हणाले मी पण तेच म्हणालो यापेक्षा अधिक काहीही घडलं नाही. त्यांनी जर वाद वाढवला तर दुप्पट वाद वाढवायची आमची तयारी आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला आरे ला कारे नेच उत्तर द्यायचं शिकवलं आहे.” असं पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांना सांगितलं.