सांगली : आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला सांगलीतील शांतिनिकेतन शाळेत टाळ-मृदंगाच्या साथीने शाळकरी मुलांचा दिंडी व रिंगण सोहळा रंगला. पारंपरिक वेशभूषा, मुखी हरिनामाचा जागर करीत शाळेतील मुले शनिवारी या आनंदसोहळ्यात सहभागी झाली होती. महाराष्ट्राच्या मराठमोळ्या परंपरांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत जाणीवपूर्वक नेण्यासाठी येथील नवभारत शिक्षण मंडळाच्या वतीने नेहमीच विविध सणांचे नेटके नियोजन केले जाते. या अंतर्गत मागील २५ वर्षांची परंपरा राखत यंदाही देवशयनी अर्थात आषाढी एकादशीचे औचित्य साधून संस्थेच्या विविध शाखांच्या वतीने दिंडी, शोभायात्रा व रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. वैशाली पाटील यांनी साकारलेली माउलींची रांगोळी या सोहळ्याचे खास आकर्षण ठरली. विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई, संत मुक्ताई यांच्यासह टाळकरी, वीणेकरी, वासुदेव आणि वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेतील शेकडो विद्यार्थ्यांच्या सहभागाने शांतिनिकेतन परिसर महादेव मंदिर, साखर कारखाना मार्गावरून शोभायात्रा संपन्न झाली.
संस्थेच्या मध्यवर्ती क्रीडांगणावर पंढरपूरच्या धर्तीवर अत्यंत भव्य दिमाखदार व नेत्रदीपक असा रिंगण सोहळा मानाच्या अश्वासोबत दिमाखात पार पडला. संजयनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक किरण स्वामी, इतर पोलीस कर्मचारी यांच्यासह लहान मोठ्या सर्वांनीच पावसाची तमा न बाळगता या गोल रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषेत उपस्थित संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह महिला पालकांनीही फुगड्यांचे फेर धरले. अनिकेत शिंदे, शाहीर हर्षवर्धन माळी व सहकाऱ्यांनी सादर केलेले अभंग, भजन, कीर्तन यांच्या साथीने हजारोंच्या उपस्थितीत विठ्ठलनामाचा जयघोष अवघ्या परिसरात दुमदुमला.
संस्थेच्या शांतिनिकेतन बालविकास केंद्र मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, शांतिनिकेतन विद्यामंदिर, शांतिनिकेतन कन्या शाळा, डे बोर्डिंग, लेफ्ट. जन. एस.पी.पी थोरात अकॅडमी आदी शाखांच्या हजारो विद्यार्थ्यांनी याची देही याची डोळा या सोहळ्याचा आनंद घेतला. संचालक गौतम पाटील, उपसंचालक डी. एस. माने, बी. आर. थोरात, अकादमीच्या प्रमुख डॉ. समिता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीचे पूजन व आरती संपन्न झाली. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन संजय बामणे, जीवन कदम यांनी केले.