राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसटी कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह २२ कामगार संघटनांचे प्रतिनिधी हजर होते. यावर भाजपाने आक्षेप घेतला. भाजपा आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार शरद पवारांकडे दिला का? असा सवाल उपस्थित केला. तसेच शरद पवार संविधानाला डावलून मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेत असल्याचा आरोप केला. यावर आता स्वतः शरद पवार यांनीच प्रत्युत्तर दिलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार म्हणाले, “मी त्यांच्या ज्ञानाबद्दल कौतुक करतो. प्रश्न असा आहे की एखाद्या कामगार संघटनेने मला बोलावलं, आणखी कुणाला बोलावलं तर लोकशाहीत त्यांच्याशी चर्चा करण्याचा अधिकार आहे की नाही? या अधिकाराने चर्चा केली असेल तर त्यात काहीच चुकीचं नाही. मुख्यमंत्री हेच महाराष्ट्राचे निर्णय घेतात. त्यांची प्रकृती ठीक नव्हती म्हणून प्रत्यक्ष यायला त्यांना मर्यादा होत्या.”

“परिवहन मंत्र्यांनी जी काही चर्चा झाली ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवली असणार”

“असं असलं तरी परिवहन मंत्र्यांनी जी काही चर्चा झाली ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवली असणार आहे. महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री एकत्रित विचारानेच घेतात,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

राम कदम यांचा नेमका आक्षेप काय?

मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीवरुन भाजपाने नाराजी जाहीर केल आहे. भाजपा आमदार राम कदम यांनी टीका करताना मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांकडे चार्ज दिला आहे का? अशी विचारणा केली आहे. “शरद पवार घटनाबाह्य संविधानाला डावलून मंत्री आणी अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात?,” असा सवालही त्यांनी विचारला आहे.

राम कदम यांचं ट्वीट –

“माननीय शरद पवारांना मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा चार्ज दिला आहे का? आणि जर नाही तर ते घटनाबाह्य संविधानाला डावलून मंत्री आणी अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात? आणी शरद पवारांना बैठका घ्यायचाच असतील तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाहीत? केवळ एकच निदान माफक अपेक्षा,” असं राम कदम यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा : “शरद पवार संविधानाला डावलून मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात?”

“तुम्ही मध्यस्थी करूनही एसटी कर्मचारी संपावर ठाम का?”

पत्रकारांनी तुम्ही मध्यस्थी करूनही एसटी कर्मचारी संपावर ठाम का? असा प्रश्न विचारला. यावर शरद पवार म्हणाले, “संपाबाबत निर्णय घ्यायचा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे. त्याबाबत मी काही बोलू शकत नाही. मला स्वतःला असं वाटतं की विलिनीकरण याचा अर्थ काय, तर या सर्व कामगारांना शासकीय कर्मचारी मानायचे. हे सुत्र एका ठिकाणी मान्य केल्यानंतर एवढ्यावर सिमीत राहणार नाही, अशी चर्चा आहे. त्यावर अंतिम निर्णय माझ्या हातात नाही. सरकार काय करायचं आहे ते करेल.”

राष्ट्रवादी काँग्रेस आगामी ५ पैकी ३ राज्यांच्या निवडणुका लढणार

शरद पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस आगामी ५ पैकी ३ राज्यांच्या निवडणुकीत सहभागी होईल. मणिपूरमध्ये राष्ट्रवादीचे ४ आमदार होते. त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून निवडणूक लढण्याबाबत चर्चा झालीय. मणिपूरमध्ये आम्ही एकूण ५ ठिकाणी निवडणूक लढू.”

“गोव्यात राष्ट्रवादीची काँग्रेस, टीएमसीसोबत चर्चा सुरू”

“गोव्यात काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादीची चर्चा सुरू आहे. गोव्यात काही ठिकाणी आम्हाला निवडणूक लढवायची होती त्याची यादी आम्ही इतर दोन्ही पक्षांना दिलीय. पुढील २ दिवसात त्यावर अंतिम निर्णय होईल,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

“उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाची युती”

शरद पवार म्हणाले, “उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या पक्षांची युती झालीय. या सर्वांची एक मोठी बैठक होईल. तिथं काही जागा लढवण्यावर आमची चर्चा झाली आहे. उद्या लखनौमध्ये जागांची वाटप घोषित होईल.”

हेही वाचा : “शरद पवार यांनी जनतेचा विचार करून रयत संस्थेचे अध्यक्षपद सोडावे”, शिवसेनेच्या ‘या’ आमदाराची मागणी

“पुढील आठवड्यात आम्ही सर्व उत्तर प्रदेशमधील प्रचारात सहभागी होऊ. उत्तर प्रदेशमधील परिस्थिती खूप बदलली आहे,” असंही पवारांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar answer question of bjp over taking meeting of minister officer on st bus employee protest pbs
First published on: 11-01-2022 at 16:46 IST