बारामती : राज्यातील सहकारी संस्थांमध्ये मी आजपर्यंत कोणतेही पद घेतले नाही. पद हे इतरांना द्यायचे असते, इतरांना मोठे करायचे असते. मीच पद घ्यायला लागलो तर काय होईल, असा सवाल करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘लोकांना बरोबर घेतले असते, तर ही वेळ आली नसती’ असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला.
बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे निवडणूक लढवित असून, त्यांनी अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून स्वत:च्या नावाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गोविंदबाग येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच पत्रकार परिषदेत अजित पवार यांचे नाव न घेता टीका केली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
माळेगाव कारखान्याचे अनेक जण अध्यक्ष झाले. मागील काळात रंजन तावरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पॅनल विजयी झाले होते. त्यांना मदत करणे हाच माझा दृष्टीकोन होता. कोण कोणत्या पक्षाचा आहे, हे मी पाहिले नाही.’ ‘माळेगावची निवडणूक ही राज्याची नसून, स्थानिक आहे. आमची टोकाची भूमिका घ्यायची इच्छा नव्हती. लोकांना बरोबर घेण्याची मानसिकता दाखवली असती, तर ही वेळ आली नसती.’ असे शरद पवार हे अजित पवार यांचे नाव न घेता म्हणाले.
‘शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करतो. सध्या माझे लक्ष ‘एआय’कडे आहे. त्यासाठी बारामतीमध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे शरद पवार म्हणाले.
‘अध्यक्ष होता येते का?’
या कारखान्याच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांनी अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून नाव घोषित केले आहे. मात्र, ब वर्ग गटातील संचालकाला अध्यक्ष होता येत नसल्याचा दावा काहींनी केला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवायचा अधिकार आहे. त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. त्यांना अध्यक्ष होता येते की नाही, हे माझ्यापेक्षा सहकारातील तज्ज्ञांना विचारले तर जास्त संयुक्तिक होईल.’
चौरंगी लढतीने अजित पवारांची कोंडी
या कारखान्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ‘श्री नीळकंठेश्वर पॅनेल’, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ‘बळीराजा सहकार बचाव पॅनेल’, कारखान्याचे माजी अध्यक्ष, भाजपचे नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचे ‘सहकार बचाव शेतकरी पॅनेल’ आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचे पॅनेल यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पॅनलबरोबरच पारंपरिक विरोधक तावरे यांच्याशीही लढा द्यावा लागत आहे. त्यातून सुटका करण्यासाठी प्रचारासाठी ते स्वत: उतरले आहेत.