राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी बंडखोर अजित पवार गटातील नेत्यांवर टीका करताना भाजपाबरोबर गेलेत त्यांना कमळाच्या चिन्हावर लढावं लागेल, असं वक्तव्य केलं. यानंतर अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे यांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर देत तुम्ही कितीही जन्म घेतले तरी अजित पवार होऊ शकत नाही, असा टोला लगावला. यावर रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. ते शुक्रवारी (२२ सप्टेंबर) कल्याणमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

रोहित पवार म्हणाले, “अजित पवारांसारखं व्हायचंही नाही. अजित पवार मोठे नेते आहेत. मात्र, मी नेता बनण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. मी विचार जपण्यासाठी राजकारणात आलो आहे.”

“आम्ही भूमिका घेतल्याने काही लोकांना आम्ही नेते बनतोय असं वाटतं”

“शरद पवारांबरोबर राहून गेली ३०-४० वर्षे लढणारी फळी अचानकपणे भाजपाबरोबर गेली. त्यानंतर आम्ही दुसऱ्या तिसऱ्या रांगेत असणारे कार्यकर्ते अचानक पुढच्या रांगेत आलो आणि लढत असताना आम्ही भूमिका घेतली. ही भूमिका घेतल्यामुळे काही लोकांना आम्ही नेते बनतोय असं वाटत असेल, तर ते चुकीचं आहे,” असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं.

“आम्हाला नेता बनण्याची घाई नाही”

“त्यांना फक्त नेते माहिती आहेत, आम्हाला कार्यकर्ते आणि लोक माहिती आहेत. आम्ही कार्यकर्ते म्हणून लढत राहू. आम्हाला नेता बनण्याची घाई नाही,” असं म्हणत रोहित पवारांनी तटकरेंना टोला लगावला.

सुनिल तटकरे नेमकं काय म्हणाले होते?

सुनिल तटकरे यांनी रोहित पवार यांच्यावर बोचरी टीका केली. रोहित पवार अकाली प्रौढत्व आल्यासारखे वागतात, जणू जगातील देशातले राजकारण एकट्यालाच कळतं असा त्यांचा अविर्भाव असतो, असे सुनील तटकरे म्हणाले. जे भाजपाबरोबर गेलेत त्यांना कमळाच्या चिन्हावर लढावं लागेल असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलं होतं. त्यावर तटकरे बोलत होते.

हेही वाचा : अजित पवारांसारखा भाऊ मिळणे हे सुप्रियाताईंचे भाग्य – सुनील तटकरे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार हे दादा आहेत, त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. पहिल्यांदाच विधानसभेत निवडून आलात त्यात अजित पवारांचे योगदान मोठे आहे, असं सुनिल तटकरेंनी म्हटलं. तसेच चांगल्या प्रकारे काम करा असा सल्लाही दिला. रोहित पवार माध्यमांमध्ये येण्यासाठी अशी वक्तव्य करत असल्याचाही आरोप तटकरेंनी केला.