लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे १० पैकी आठ खासदार निवडून आले आहेत. त्यांच्यापासून वेगळ्या झालेल्या अजित पवारांच्या पक्षाला फक्त एक जागा मिळाली आहे. यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.

काय म्हणाले आहेत जितेंद्र आव्हाड?

“शरद पवारांना भटकती आत्मा म्हणणं ही चूक आहे. एखाद्या ज्येष्ठ ८४ वर्षांच्या माणसाबद्दल असं वक्तव्य करणं दुर्दैवी आहे. अर्थात शरद पवार अशा टीका गांभीर्याने घेत नाही. त्यांच्या मनाचा हा मोठेपणा आहे. पण मराठी माणूस कधीच कोणाच्या निधनावर कधीही चर्चा करत नाही. आता हे सगळे विषय बंद करायला हवेत. जनतेने आता मतपेटीद्वारे त्यांना काय हवं आहे ते दाखवून दिलं आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष जन्माला घातला. या पक्षाला २५ वर्षे झाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला २५ वर्षे शरद पवारांचीच आहे. लोकसभा निवडणूक निकालांत जनतेने राष्ट्रवादी पक्ष कुणाचा आहे ते दाखवून दिलं आहे.” असं आव्हाड म्हणाले आहेत.

हे पण वाचा- “हा भटकता आत्मा तुम्हाला…”, शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना सुनावले खडे बोल

१४ जुलैला काय होतं पाहू

“महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांना आता काही दिवस उरले आहेत. सप्टेंबर महिन्यांत आचारसंहिता लागेल. निवडणूक लागण्यापूर्वीच प्लानिंग करायचं असतं. यांना पक्ष फोडाफोडीतून वेळ मिळाला नाही. १४ जुलैला न्यायालयात काय होतं ते आम्ही पाहून घेऊ” असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

भाजपाला खातेवाटपावरुन टोला

“तुम्ही युती धर्माला खरंच मानता का? तुम्ही युती धर्म पाळता का? युती धर्मातल्या आपल्या सहकाऱ्यांचा सन्मान ठेवता का? तुमच्याबरोबर कोणी युती करेल… एकनाथ शिंदे यांचे सात खासदार आहेत. त्यांना तुम्ही किती मंत्रिपद दिले. कुमार स्वामींना किती दिले, चिराग पासवान यांना किती दिले… चिराग पासवान आणि एकनाथ शिंदे एकच संख्येत आहेत. तर चिराग पासवान यांना दोन मंत्रिपदं देता आणि एकनाथ शिंदे यांना एकच राज्यमंत्रिपद घेऊन जा.”असं म्हणत एनडीए सरकारमधील खाते वाटपावर जितेंद्र आव्हाडांनी टीका केली.

शरद पवार चक्रधारी श्रीकृष्णाप्रमाणे

लोकसभा निवडणुकीनंतर जेव्हा मी शरद पवारांकडे पाहतो आहे तेव्हा मला ते चक्रधारी श्रीकृष्णाप्रमाणे दिसत आहेत, जे शिशुपाल होते त्यांचा नायनाट झाला. अंजली दमानिया जे काही बोलतात ते स्पष्ट बोलतात. तुम्ही कुणाला कितीही संपवण्याचा प्रयत्न केला तरीही तो संपत नसतो. शरद पवारांनाही संपवण्याचे प्रयत्न झाले. मात्र ते कुणालाही जमलं नाही. शिशुपालांचा नायनाट झाला असंही आव्हाड म्हणाले आहेत.