महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरा भूकंप झाला तो २ जुलै २०२३ ला. कारण अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांसह नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या घडामोडी घडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे असं चित्र आहे. आज दोन बैठका घेण्यात आल्या आहेत. पहिली बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी शरद पवार घेत आहेत. तर दुसरी अजित पवार घेत आहेत. अजित पवार यांच्या बैठकीला शरद पवार गटापेक्षा जास्त आमदारांची उपस्थिती आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत असं म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे छगन भुजबळ यांनी?

“मी तुरुंगातून बाहेर आलो तेव्हा अनेकांनी आमिषं दाखवली. पण आम्ही गेलो नाही. शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलो आणि काम केलं. पण आता काय हा प्रश्न आहेच. साहेबांना (शरद पवार) वाईट वाटणं स्वाभाविक आहे. दिलीप वळसे पाटील यांच्यापासून सगळी मंडळी गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी तरळणं स्वाभाविक आहे.” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

शरद पवार आमचे विठ्ठल

“आम्हाला विचारलं जातं की शरद पवारांचा फोटो का वापरला? अरे, साहेब आमचे विठ्ठल आहेत, पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. त्या बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला या अशी माझी शरद पवार यांना विनंती आहे. मला एक सांगा ही सगळी मंडळी वेडी आहेत का? जी आमच्याबरोबर आली आहेत. आमच्या बरोबर आलेले काही लोक तर आमदार किंवा नामदारही नाहीत. पण तिथे (शरद पवार गट) काम करणारे पदाधिकारी या सगळ्याला जबाबदार आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांना नीट वागवायचं नाही.

आजही माझ्या मनात शरद पवारांविषयी प्रेम आहे. पण आपण वसंतदादांना सोडलं तेव्हा वसंत दादांनीही असंच वाईट वाटलं. मी बाळासाहेब ठाकरेंसह होतो. मी त्यांना आई वडिलांच्या ठिकाणी मानत होतो. पण ३६ लोक तुमच्याकडे आले होते. तेव्हा मलाही येणं भाग पडलं. तुम्ही सांगितलं नाही की तिथे थांबा. मी तुमच्याबरोबर आलो. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेबांनाही असंच वाईट वाटलं. धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत घेतलं तेव्हा त्यांचे काका गोपीनाथ मुंडे आणि बहीण पंकजा मुंडे यांनाही असंच वाईट वाटलं. या सगळ्याची पुनरावृत्ती झाली आहे. अजूनही काही बिघडलेलं नाही. अजित पवारांच्या नेतृत्त्वात आम्ही शेतकऱ्यांसाठी, ओबीसींसाठी, दलितांना न्याय देण्यासाठी काम करणार आहोत.” असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने आठवलं राज ठाकरेंचं वक्तव्य

राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा जे भाषण केलं तेव्हा त्यांनी बाळासाहेब ठाकरेंविषयी असंच वक्तव्य केलं होतं. माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही तर त्यांच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे असं राज ठाकरे शिवसेना सोडताना म्हणाले होते. त्यांचं हे वक्तव्य चांगलंच गाजलं होतं. त्याच प्रमाणे आज छगन भुजबळ यांनी शरद पवार यांचाही उल्लेख विठ्ठल असा केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते बडवे कोण?

छगन भुजबळ यांनी शरद पवार आमचे विठ्ठल आहेत आणि त्यांना बडव्यांनी घेरलं आहे असं वक्तव्य करताच राष्ट्रवादीतले बडवे कोण? अशी चर्चा सुरु झाली आहे. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे यामध्ये येतात का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.