scorecardresearch

रोहित पाटील यांच्या फलकबाजीवर शरद पवार, जयंत पाटील दिसेनात!

माजी उपमुख्यमंत्री आर. आर. आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी तातडीने विधानसभेची तयारी सुरू केली आहे.

rohit-patil
रोहित पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भावी आमदार म्हणून झळकलेला फलक

दिगंबर शिंदे, लोकसत्ता

सांगली : राज्यातील सत्तांतरानंतर सत्तेवर आलेले एकनाथ शिंदे यांचे सरकार अल्पजीवी ठरेल आणि वर्षांखेरीस मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागेल, असे भाकीत वर्तवण्यात येत असल्याने सजग झालेल्या माजी उपमुख्यमंत्री आर. आर. आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी तातडीने विधानसभेची तयारी सुरू केली आहे. सोमवारी झालेल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त मतदार संघामध्ये लावण्यात आलेल्या फलकावर भावी आमदार म्हणून त्यांची छबी मतदारांवर बिंबवण्याचे प्रयत्न झाले. मात्र या फलकावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार अथवा प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या छायाचित्रांना स्थान मिळालेले नसून यामागील राजकीय तर्कवितर्काची सध्या मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे.

कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीवेळी खासदार संजय पाटील, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे आणि महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे ही सर्व दिग्गज मंडळी एकत्र आली असतानाही राष्ट्रवादीच्या चिन्हावर नगरपंचायतीची सत्ता हस्तगत केली. यामुळे विश्वास दुणावलेल्या रोहित पाटील यांनी आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे.

आबांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये रोहित पाटलांच्या मातोश्री सुमनताई पाटील यांनी सहज विजय संपादन केला. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतही त्यांनी विजय संपादन केला. २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवेळी रोहितच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील अशी घोषणा आबांच्या निधनानंतर पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली होती. त्यामुळे त्यादृष्टीने रोहित यांची चाचपणी सुरू आहे. सोमवारी त्यांचा वाढदिवस होता. या निमित्ताने बैलगाडी शर्यतीसह विविध  कार्यक्रमांचे आयोजन तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यात करण्यात आले होते. या निमित्ताने तासगाव, कवठेमहांकाळ शहरासह मतदार संघामध्ये भावी आमदार म्हणून डिजिटल फलक झळकावण्यात आले आहेत. या फलकावर केवळ रोहित पाटील यांचीच छबी अधिक उठावदार केली आहे. या फलकावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार अथवा प्रदेशाध्यक्ष जयंत  पाटील यांच्या छायाचित्रांना मात्र स्थान मिळालेले नाही. स्थानिक पातळीवरील  कार्यकर्त्यांची छायाचित्रे मात्र लावण्यात आली आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar jayant patil not seen on rohit patil s banner zws

ताज्या बातम्या