Amit Shah On Sharad Pawar : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग गावी ते वेंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड अ‍ॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेडने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले आहेत. यावेळी त्यांनी संस्थेच्या काजू प्रक्रिया युनिट आणि माती तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी सहकार क्षेत्रावरून माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना लक्ष्य केले आहे. यावेळी त्यांनी, शरद पवार दहा वर्षे केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रासाठी काय केले? असा थेट सवाल केला आहे.

यावेळी सहकार क्षेत्राबाबात बोलताना अमित शाह म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून देशभरातील सहकार क्षेत्रातील लोक, सहकार मंत्रालय स्थापन करण्याची मागणी करायचे, त्यांचे कोणीही ऐकत नव्हते. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर सहकार मंत्रालयाची स्थापना केली आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. इथे आत्मनिर्भरतेची सर्वात सुंदर कुठली व्याख्या असेल तर ती सहकार आहे.”

पवार साहेब महाराष्ट्राला हिशोब द्या…

अमित शाह यांनी पुढे बोलताना माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनाही लक्ष्य केले. ते म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या करावरून वाद होत होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपा सरकारने हा प्रश्न सोडवला. आज मी या व्यासपीठावरून पवार साहेबांना विचारू ईच्छितो की, तुम्ही दहा वर्षे देशाचे कृषी मंत्री होता. त्यावेळी सहकार क्षेत्र कृषी मंत्रालयांतर्गत होते. तेव्हा तुम्हा सहकार क्षेत्रासाठी काय केले? साखर कारखान्यांसाठी काय केले आणि शेतकऱ्यांसाठी काय केले? याचा हिशोब तुम्ह महाराष्ट्राला द्यायला हवा. पवार साहेब नेता होण्यासाठी फक्त मार्केटींग पुरेसे नाही. त्यासाठी तळागात काम कारावे लागते. मी इथे आज राजकारण करण्यासाठी आलो नाही. पण, सहाकार मंत्रालयाची स्थापना आणि साखर कारखान्यांच्या कराच्या प्रश्नांसारख्या समस्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सोडवल्या आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मालेगावातील या कार्यक्रमासाठी अमित शाह यांच्यासह केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) माजी मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.