सांगली : अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत फसवी असल्याच्या आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्यावतीने काळी दिवाळी साजरी करण्यात आली. पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मौन पाळत सरकारचा निषेध नोंदवला.
राज्यात अतिवृष्टीमुळे चौफेर नुकसान झाले आहे, कधी नव्हे असे नैसर्गिक संकट आल्यामुळे राज्यातील बळीराजा पूर्णत उद्ध्वस्त झाला आहे. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे भव्य मोर्चा काढून राज्यात सरसकट कर्जमाफी व ओला दुष्काळ जाहीर करून हेवटरी ५० हजार रुपयांची मदत करण्याची मागणी सरकारकडे व्यक्त केली होती.
मात्र, महायुती सरकारने घाईघाईत ३६ हजार ५०० कोटींची फसवी मदत जाहीर केली आहे. सरकारने बळीराजाच्या डोळ्यात धुळफेक करून ही फसवी मदत दिलेली आहे. त्याचा पक्षाच्यावतीने निषेध करण्यात आला. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोणत्याही घोषणा न देता कार्यकर्त्यांनी मौन स्वीकारत बैठे आंदोलन केले. शासनाने ही फसवी मदत करण्यापेक्षा तातडीने सरसकट कर्जमाफी करून, ओला दुष्काळ जाहीर करावा, हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणीही करण्यात आली.
या आंदोलनाची दखल घेऊन शेतकरी वर्गाला न्याय द्यावा, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराज पाटील व शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे तहसीलदार लीना खरात यांना देण्यात आले.
यावेळी माध्यमांशी बोलताना ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील म्हणाले, महायुती सरकारने मदतीची केवळ घोषणाच केली आहे. प्रत्यक्षात पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडून मदत देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.अतिवृष्टीने शेतकर्यांचे संसार उध्वस्त झाले असताना सरसकट पंचनामे करण्याची मागणी आहे. सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागाबरोबरच उसावरही अतिवृष्टीने परिणाम झाला असून उत्पादनात घट येणार आहे.शासनाने मदत देत असताना हेक्टरी ५० हजार रूपये द्यावी अशी आमची मागणी आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदतीचा हात देउन त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी मानवतेच्या भावनेतून पाहायला हवे, मात्र, सरकार केवळ वेळकाढू पणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
या आंदोलनात श्री. पाटील, बजाज यांच्यासह शेखर माने, वैभव शिंदे, टी.व्ही. पाटील, आनंदराव नलवडे, सचिन जगदाळे, विवेक कोकरे, हरिदास पाटील, हायूम सावनूरकर, विराज कोकणे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.