Sharad Pawar On Ajit Pawar : विधानसभेच्या निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरु आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. सध्या अनेक नेत्यांकडून राज्यातील विविध मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या जात आहेत. या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्याही दररोज वेगवेगळ्या मतदारसंघात सभा पार पडत आहेत.

आज त्यांची शिरुर विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडली. यावेळी सभेत बोलताना शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभेत पुन्हा एकदा नक्कल केली. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांच्या विरोधात बोलत कारखाना कसा चालू होतो ते बघतो. आमदार कसा होतो तेच बघतो, असं म्हटलं होतं. हेच वाक्य शरद पवार यांनी आज जाहीर सभेत म्हणत अजित पवारांची नक्कल करत जोरदार हल्लाबोल केला.

हेही वाचा : “धनुष्यबाणाला मत दिलं नाही तर ३,००० रुपये वसूल करू”, भाजपा नेत्याची ‘लाडक्या बहिणीं’ना तंबी

शरद पवार काय म्हणाले?

“शिरुर तालुक्यात साखर कारखाने झालेत. त्यामुळे लोकांच्या हाताला काम मिळत आहे. शेती व्यवसाय सुधारला. दुधाचा धंदा वाढला. औद्योगिक वसाहती झाल्या. तालुक्यात अनेक गोष्टी होत असल्यामुळे तालुक्याचा चेहरा बदलतोय. याचा आम्हा लोकांना आनंद आहे. आलिकडच्या काळात येथील सर्व कामांची जबाबदारी अशोक पवार यांच्या खांद्यावर गेली आणि त्या दोघांनी ज्या प्रकारे काम केलं आणि आताही करत आहेत. दोघं कोण लक्षात आलं ना? आम्हा लोकांची त्यांच्याबाबत कोणतीही तक्रार नाही. शिरुर तालुक्याची चिंता करायची नाही. येथील लोकांचा त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे काहीही काळजी करण्याची आवश्यकता नाही”, असं म्हणत शरद पवार यांनी आमदार अशोक पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या कामाचं कौतुक केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल

“तुमच्या सर्वांचा आम्हाला पाठिंबा असल्यामुळे आम्हाला काळजी नाही. मात्र, आम्हाला फक्त एकच काळजी आहे. काही माणसं बाहेरून येतात आणि सांगतात साखर कारखाना कसा चालू होतो मी बघतो. मोठं अवघडं आहे. मागे लोकसभेच्या निवडणुकीवेळी आमच्या एका नेत्यांने सांगितलं कसा निवडून येतो ते बघतो? त्यांचा मी आभारी आहे. ते अमोल कोल्हेंबाबत असं म्हणाले. पण त्यानंतर तुमच्यासह सर्व लोकांनी जबाबदारी घेतली लाखोंच्या मताधिक्यांनी अमोल केल्हेंना निवडून दिलं”, असं शरद पवार यांनी अजित पवारांची नक्कल करत म्हटलं.