साताऱ्याचे विद्यमान खासदार, श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कोणाला संधी देण्यात येते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. खासदार शरद पवार यांनी आज सातारा मतदारसंघात जाऊन पदाधिकाऱ्यांची बैठक घेत सविस्तर चर्चा केली. यावेळी उमेदवारी संदर्भात पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. यानंतर बोलताना शरद पवार यांनी साताऱ्यातील उमेदवार कोण असेल? याबाबतचा निर्णय दोन दिवसांमध्ये घेण्यात येईल, असे सांगितले.

शरद पवार काय म्हणाले?

“साताऱ्याच्या जागेसंदर्भात बैठकीत महत्वाची चर्चा झाली. खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांनी असेही सांगितले की, पक्षासाठी सर्व काम करेल. साताऱ्याचा उमेदवार देताना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे मी ऐकून घेतले आहे. सर्वांनी ज्या सूचना केल्या आहेत, त्या पक्ष हिताच्या आहेत. काही जणांनी माझे नावही साताऱ्यासाठी सूचवले. मात्र, माझ्यावर इतर महत्वाच्या जबाबदाऱ्या असल्याने ते शक्य होणार नाही”, असे शरद पवार म्हणाले.

हेही वाचा : छ. संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी, लाथाबुक्क्यांनी मारहाण; नेमकं प्रकरण काय?

साताऱ्यातून कोणाला संधी मिळणार?

श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे लोकसभेसाठी कोणाला संधी मिळणार? याकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. साताऱ्यांमधून लोकसभेसाठी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी काही नावे शरद पवार यांना सूचविले आहेत. यानंतर शरद पवार यांनीही कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. साताऱ्याचा उमेदवार कोण असेल? याची घोषणा आज होईल, असे वाटत होते. मात्र, हा निर्णय त्यांनी आज जाहीर न करता दोन दिवसांनी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले.

आघाडीच्या जागावाटपाचा तिढा कधी सुटणार?

लोकसभा निवडणूक जाहीर झाली. मात्र, तरीही महाविकास आघाडीतील काही जागांबद्दल शिवसेना, काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे आघाडीच्या जागावाटपाचा तिढा कधी सुटणार? याबाबत आघाडीतील नेते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. याबरोबरच पुढील दोन दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.