शरद पवार हे राज्याच्या केंद्रस्थानी असलेले नेते आहेत हे त्यांनी २ मे ते ५ मे या तीन दिवसांमध्ये पुन्हा एकदा राज्याला आणि देशाला दाखवून दिले आहे. राजकारणात भाकरी फिरवण्यात पटाईत असलेल्या शरद पवारांनी राजीनामा दिला आणि तो मागे घेतला तेव्हा काय काय घडामोडी घडल्या ते महाराष्ट्राने पाहिले. अशात फक्त एक फोन फिरवून शरद पवारांनी धुमसणाऱ्या मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या मुलांची सुटका केली. आज शरद पवार यांनीच याबाबत माहिती दिली आहे.

काय घडली घटना?

सांगलीतल्या जत तालुक्यातले काही विद्यार्थी हे मणिपूरमध्ये शिक्षणाच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. मात्र मणिपूर पेटले आहे आणि हिंसाचार होतो आहे. या धुमसणाऱ्या मणिपूरमध्ये महाराष्ट्रातले विद्यार्थी अडकले. जत तालुक्यातल्या आवंडी गावाचे रहिवासी संभाजी कोडग यांचा मुलगा मयूरने आपल्या वडिलांना फोन केला. मणिपूरची परिस्थिती सांगितली आणि चारही बाजूंना गोळीबार होतोय, कदाचित हा माझा शेवटचा फोन असेल असेही सांगितले.

मुलाने असा फोन केलेला ऐकून वडिलांच्या काळजाचे पाणी झाले. त्यानंतर संभाजी कोडग यांनी बारामतीच्या प्रल्हाद वरेंना फोन केला. मणिपूरच्या दंगलीत महाराष्ट्रातली १० मुले हॉस्टेलवर अडकल्याचे सांगितले आणि त्यांना काहीही करून वाचविण्याची विनंती केली. त्यानंतर ५ मे रोजी आपण शरद पवारांना भेटू असे वरे यांनी संभाजी कोडग यांना सांगितले. पण मणिपूरची परिस्थिती चिघळत होती. त्यामुळे संभाजी कोडग यांनी शरद पवारांना एवढा निरोप द्या, अशी विनंती केली. त्यानंतर प्रल्हाद वरे यांनी शरद पवारांचे खासगी सचिव सतीश राऊत यांना तातडीने संपर्क केला आणि ही परिस्थिती सांगितली.

सतीश राऊत यांनी ही सगळी परिस्थिती ऐकली आणि शरद पवार यांना तातडीने हा निरोप दिला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शरद पवार यांनी तातडीने मणिपूरच्या राज्यपालांना फोन केला. ज्यानंतर, महाराष्ट्रातल्या १० मुलांसह दुसऱ्या राज्यातील दोन मुलांना सुरक्षित ठिकाणी न्या, अशी विनंती केली. यानंतर रात्री १२च्या सुमारास संभाजी कोडग यांचा मुलगा मयूरला मणिपूर लष्कराच्या चीफ कमांडरचा फोन आला आणि आम्ही तुम्हाला सुरक्षित स्थळी नेत आहोत, असे त्याला सांगितले. या १२ विद्यार्थ्यांना रात्रीच सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. एकीकडे शरद पवार हे अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत होते, पण दुसरीकडे लोकोपयोगी कामे त्यांनी सुरू ठेवली होती हेच यातून दिसून येत आहे.

शरद पवार यांनी नेमके काय म्हटले आहे?

मणिपूरच्या IIT शैक्षणिक संस्थेत काही विद्यार्थी अडकले. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी माझ्याशी संपर्क केला. आता मी मणिपूरमध्ये अडकलेल्या या मुलांना सरकारने परत आणावे यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह चर्चा करतो आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालकांनी मानले शरद पवारांचे आभार

दुसरीकडे शरद पवार यांनी तातडीने सूत्रे फिरवत मुलांना सुरक्षित स्थळी नेण्याची व्यवस्था केल्याने या मुलांच्या पालकांनी शरद पवारांचे आभार मानले आहेत.