Rohit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीच्या नेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेत आलं तरी अद्याप कर्जमाफीचा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे निवडणुकीत महायुतीने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही सरकारकडून होताना दिसत नाही. त्यामुळे सत्तेत आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी दिलेली आश्वासनं हवेतच विरले का? असा सवाल विरोधक विचारत आहेत.
यातच महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे राज्य सरकारने मोठी घोषणा करत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर केलं. मात्र, यातही कर्जमाफीचा निर्णय झालेला नाही. याच मुद्यांवरून आता शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. आमदार रोहित पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्यांवरून सरकारला सवाल विचारला आहे. या अनुषंगाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून सोमवारी (दि.२० ऑक्टोबर) श्री क्षेत्र देहू येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
“जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांनी त्यांच्या वडिलांच्या सावकारीच्या नोंदी असलेल्या वह्या इंद्रायणी नदीत बुडवून लोकांचं कर्ज माफ केलं होतं. लौकिकार्थाने ‘शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करणारे’ म्हणूनही तुकोबारायांना ओळखलं जातं. आज अतिवृष्टीने राज्यातील शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. सरकारमधील मंत्री, आमदार यांच्या घरात दिवाळीचा लखलखाट असला तरी दारात दिवा लावण्याचीही शेतकऱ्याची परिस्थिती नाही, त्यामुळं त्याचं घर आज काळोखात आहे”, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
“त्याच्या घरातील अंधार दूर करून त्याला जगण्यासाठी आशेचा किरण दिसावा यासाठी त्याच्या गळ्यात अडकलेला कर्जाचा फास काढणं आज नितांत गरजेचं आहे. मात्र तरीही हे सरकार कर्जमाफीचा निर्णय घेत नाही”, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांनी त्यांच्या वडिलांच्या सावकारीच्या नोंदी असलेल्या वह्या इंद्रायणी नदीत बुडवून लोकांचं कर्ज माफ केलं होतं. लौकिकार्थाने 'शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करणारे' म्हणूनही तुकोबारायांना ओळखलं जातं.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 19, 2025
आज अतिवृष्टीने राज्यातील शेतकरी पूर्णपणे कोलमडला… pic.twitter.com/X0eDpb94Wu
“डोळ्यावर झापडं आलेल्या आणि सत्तेच्या धुंदीत असलेल्या या सरकारला जागं करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वारकरी आघाडीच्यावतीने सोमवारी २० ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र देहू येथे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहे. यावेळी माझ्याबरोबर वारकरी आघाडीचे प्रमुख ह.भ.प. दत्ता महाराज दोन्हे हेही उपोषणाला बसणार आहे. आतातरी या सरकारला शेतकरी कर्जमाफी करण्याची सद्बुद्धी येईल ही अपेक्षा आणि तशी सद्बुद्धी यावी ही तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.