सातारा : भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी अर्थात दसरा दरम्यान साजरा होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाला ‘जय अंबे, जगदंबे …’ च्या जयघोषात मोठ्या धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. सालाबादप्रमाणे सातारा जिल्ह्यातील अनेक देवी मंदिरांमध्ये हा भक्ती आणि शक्तीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. प्रतापगड, औंध, मांढरदेव या जिल्ह्यातील महत्वाच्या तीर्थक्षेत्री नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
दरवर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्राची सुरुवात होऊन विजयादशमीला या उत्सवाची सांगत होते. आज या नवरात्रातील पहिली माळ व घटस्थापनेचा मुहूर्त दुपारपर्यंत असल्यामुळे सर्वत्र धांदल दिसत होता. घरोघरी मोठ्या धार्मिक वातावरणात देवी स्तुती, स्तोत्रे आणि मंत्र जागर करत घटस्थापना करण्यात आली. अनेकांनी आपल्या घरात देवघरापुढे वेदीवर घटस्थापना करून विविध सप्तधान्न्यांची पेरणी करत नवरात्रातील शेताची पेरणीही केली. पहिल्या माळेला विड्याच्या पानांची तसेच पिवळ्या फुलांची माळ अर्पण करण्यात आल्या. देवतेच्या विशेष करून कुलदेवता असलेल्या देवीच्या प्रतिमेला पुष्पहार घालून महाआरती, महाप्रसाद दाखवून घटस्थापना करण्यात आली. आता यापुढे पुढील नऊ दिवस हा देवीचा जागर मोठा उत्साहात सुरू राहणार आहे .
प्रतापगडावरही घटस्थापना
राज्याची आणि राजघराण्याची कुलदेवता असणाऱ्या श्रीक्षेत्र किल्ले प्रतापगड येथेही तुळजाभवानी मंदिरात आज सकाळीच घटस्थापना करून नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला. सातारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज असणाऱ्या खासदार श्री उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर येथील निवासस्थानी असलेल्या श्री तुळजाभवानीची ही विधिवत प्राणप्रतिष्ठा करून नवरात्र उत्सवाला पारंपारिक पद्धतीने सुरुवात झाली.
श्री क्षेत्र औंध येथील मूळ पीठ निवास यमाई देवी मंदिरासह, औंध गावातील राजवाड्यातील यमाई देवीचे स्थान असलेल्या मंदिरात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला. मांढरदेव येथील श्री काळेश्वरी तथा काळुबाई, श्री क्षेत्र देऊर येथील मुधाई देवी, जिल्ह्यातील औंध यमाई, मांढरदेव येथील काळेश्वरी,सातारा शहरातील मंगळाई देवी, मंगळवार तळ्यावरची तुळजाभवानी, शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यावरील तुळजाभवानी, कास बामनोली रस्त्यावरील घाटाई देवी, कोपर्डे येथील नागाई देवी, सातारा शहरालगतच्या जानाई मळाई देवी, देऊर येथील मुधाई देवी, पाली खंडोबा, कण्हेर येथील वाघजाई, पांडे, असले येथील भवानी येथील भैरवनाथ मंदिरातील आदी मंदिरांमध्ये विद्युत रोषणाई सह धार्मिक कार्यक्रमांसाठी ही शक्तीपीठे सज्ज झाली आहेत. या सर्व ठिकाणी पारंपारिक पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा होणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
दरम्यान महत्वाच्या तीर्थक्षेत्री भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. नऊ दिवसाच्या या उत्सव काळात पूजा अभिषेकासह धार्मिक कार्यक्रम, भजन भोंडला, श्रीसूक्त पठणासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी पारंपारिक उत्सवाला सामाजिक उपक्रमाची जोड देण्यात आली आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबाबत महिलांचा सन्मान कन्या पूजन तसेच भोंडला, गरबा दांडिया या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा शहरात विविध संस्थांच्या वतीने शेवटचे पाच दिवस रास दांडिया आणि गरबा नृत्य कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान पूजा साहित्य, देवीसाठी महावस्त्र, दागिने, सजावटीचे साहित्य, कन्या पूजनासाठी विविध वस्तूंच्या खरेदीसाठी महिला वर्गाची बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती.