ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अलीकडेच एका भाषणात कुराणमधील काही ओळींचा उल्लेख केला होता. यावरून शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाने आता भगवी शाल आणि रुद्राक्षाची माळ सोडून डोक्यावर टोपी परिधान करुन कोरं कपाळ मिरवावं, अशी खोचक टीका शीतल म्हात्रे यांनी केली आहे.

सुषमा अंधारेंवर टीकास्र सोडताना शीतल म्हात्रे म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरे हयात असताना जेव्हा शिवसेनेची सभा व्हायची, तेव्हा सर्वत्र भगवं वातावरण असायचं. सर्वत्र शिवाजीमहाराजांचा जयघोष असायचा, पोवाडे व्हायचे. सगळीकडे शिवाजीमहाराजांबद्दल बोललं जायचं. पण आता काय होतंय? जेव्हापासून उद्धव ठाकरे गटाने हिंदुत्व सोडलं आहे, बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत. तेव्हापासून कुराणची चर्चा व्हायला लागली आहे.

“तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की सुषमा अंधारे भाषणात कुराणाची चर्चा करत होत्या. त्यांनी कुराणतील काही ओळी बोलून दाखवल्या. आम्हाला कुठल्या धर्माबद्दल काही बोलायचं नाही. पण शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं आहे. हे पुन्हा एकदा दिसायला लागलं आहे. हेच आम्ही आधीपासून सांगत होतो. अजूनही आमचं सांगणं आहे की, तुम्ही जागे व्हा आणि महाविकास आघाडीची साथ सोडा, बाळासाहेबांच्या हिंदुत्वासाठी आमच्यासोबत उभं राहा” असं आवाहन टीका शीतल म्हात्रे यांनी केलं आहे.

दरम्यान, त्यांनी ठाकरे गटावर टीका करण्यासाठी केलेलं ट्वीटही वाचून दाखवलं आहे. संबंधित ट्वीटमध्ये शीतल म्हात्रे म्हणाल्या की, “विसरा आता भगवी शाल आणि रुद्राक्षाची माळ, डोक्यावरती चढवून टोपी मिरवा तुमचं कोरं कपाळ.” त्या ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.