एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केली. त्यामुळे शिवसेना पक्षात उभी फूट पडली. ही पोकळी भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून प्रयत्न सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे बंडखोर आमदार आणि खासदार यांना शह देण्यासाठी तयारी सुरु केली आहे. यावरून बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे.
“उद्धव ठाकरेंना ४० आमदारांनी मुख्यमंत्रीपदावरून खाली उतरण्यास भाग पाडले. त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी, त्यांना राजकारणातून पूर्ण संपवण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा आहे. यासाठी उद्धव ठाकरेंना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी चांगले काम हाती घेतलं आहे,” असा टोला रामदास कदम यांनी लगावला आहे.
हेही वाचा : “कोणत्या चौकात…”, बच्चू कडू यांचा रवी राणांना प्रतिइशारा; म्हणाले, “मी मरण्यासाठी तयार”
“एकनाथ शिंदे ४० आमदारांना विकासासाठी खोके…”
“गेल्या अडीच वर्षात ४० आमदारांना त्यांच्या मतदारसंघात किती निधी दिला?, त्याच ४० मतदारसंघात अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना किती निधी पुरवला, ते जनतेसमोर आलं तर बरं होईल. पक्षात राहिलेले १० ते १५ आमदार आहेत, ते कसे निवडून येतील याची काळजी उद्धव ठाकरेंनी घेतली पाहिजे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४० आमदारांना विकासासाठी खोके देत आहेत,” असेही रामदास कदम यांनी म्हटलं.
हेही वाचा : ‘कुंकू लाव मगच बोलतो’ संभाजी भिडेंच्या वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल; चाकणकर म्हणाल्या, “समाजाची विकृती…”
“आता कोण शेंबडं पोरग सुद्धा…”
“गुवाहाटीवरून आमदार कसे येतात? वरळीच्या मतदारसंघातून कसे जातात? विधानसभेत पाय कसे ठेवतात?, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला होता. मात्र, आमदार आले, त्यांनी पाय पण ठेवला. आतापर्यंत ठाकरे आडनावाची माणसे बोलत होती ते करत होती. याला गाडणार, त्याला गाडणार, याच्यावर आता कोण शेंबडं पोरग सुद्धा विश्वास ठेवणार नाही,” असा टोमणाही रामदास कदम यांनी लगावला आहे. ते टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.