“मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील सर्वच पक्ष प्रयत्न करत असताना शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठ्यांना ‘आरक्षणाची खाज’ सुटली आहे, असे अत्यंत आक्षेपार्ह व बेजबाबदार विधान केले आहे. तानाजी सावंत यांचे हे विधान मराठा समाजाची बदनामी करणारे व त्यांचा अपमान करणारे असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावंत यांच्या विधानावर खुलासा करावा व बेताल वक्तव्य करणाऱ्या तानाजी सावंत यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी,” अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. (येथे क्लिक करुन जाणून घ्या तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले.)

नक्की वाचा >> “देवेंद्र फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवलं पण त्याच ब्राह्मणानं मराठ्यांची झोळी भरली”; शिंदे गटातील मंत्र्याचं विधान

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विधानासंदर्भात नाना पटोले यांनी मुंबईमध्ये आपलं मत मांडलं. “मराठा आरक्षणाची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातून विविध संघटना, राजकीय पक्ष यांचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारी पातळीवर व न्यायालयीन पातळीवरही हा लढा सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले,” असंही नाना पटोलेंनी नमूद केलं.

नक्की वाचा >> संतोष बांगर हल्ला प्रकरण: “आदल्या दिवशी ते ठाकरेंबरोबर…”; पैसे घेतल्याचा उल्लेख करत काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

“२०१४ साली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने मराठी समाजाला आरक्षण दिले होते परंतु त्यानंतर आलेल्या फडणवीस सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा आरक्षण संपुष्टात आले. आजही हा प्रश्न सुटावा व मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असताना राज्यातील एक मंत्री अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करतो हे अत्यंत निषेधार्ह आहे,” असं म्हणत नाना पटोलेंनी तानाजी सावंतांवर टीका केली.

नक्की पाहा >> ‘हिंदू मराठ्यांच्या मुठी आवळल्या तर…’, ‘सणासुदीच्या काळात…’; ‘पाकिस्तान जिंदाबाद’वरुन राज ठाकरेंचा संताप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तानाजी सावंत हे सातत्याने वादग्रस्त विधाने करून वातावरण बिघवण्याचे काम करत असतात. प्रसिद्धी माध्यमांबद्दलही त्यांनी नुकतेच वादग्रस्त विधान केले होते. या महोदयांनी याआधी महाराष्ट्राला विकत घेण्याची भाषा केली होती,” अशी आठवण नाना पटोलेंनी करुन दिली. “तानाजी सावंत यांचे विधान सत्तेचा माज दाखवते पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, सत्तेची मस्ती कशी उतरवायची हे त्यांना चांगले माहित आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागावी व शिंदे-फडणवीस यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी,” असेही पटोले म्हणाले.