सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातून काँग्रेसचे नेते, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मंगळवारी दुपारी प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यानिमित्ताने झालेल्या शक्तिप्रदर्शनात तीन मंत्री व सुमारे डझनभर आमदारांसह कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
मंगळवारी सकाळी शिंदे व मोहिते-पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी दहापासूनच ग्रामीण भागातून कार्यकर्ते येत होते. पांजरापोळ चौकातील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अश्वारूढ पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून शिंदे व मोहिते-पाटील यांच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीचे पहिले टोक पार्क चौकाजवळ असताना दुसरे टोक पांजरापोळ चौकात होते. प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक शिवछत्रपती रंगभवनाजवळ पोहोचल्यानंतर तेथून शिंदे व मोहिते-पाटील यांनी शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आदींसह जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे जाऊन अर्ज दाखल केले. या वेळी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे, सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल यांच्यासह शेकापचे नेते, आमदार गणपतराव देशमुख, माजी मंत्री रामराजे निंबाळकर, माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे, करमाळय़ाच्या आमदार श्यामल बागल, माळशिरसचे आमदार हणमंत डोळस, दक्षिण सोलापूरचे आमदार दिलीप माने, सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे, पंढरपूरचे आमदार भारत भालके आदींनी हजेरी लावली होती.
शिंदे व मोहिते-पाटील यांची उमेदवारी दाखल करताना हजर राहण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे काल रात्री सोलापुरात आगमन झाले. रात्री त्यांनी शहर व जिल्हय़ातील दोन्ही काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, प्रमुख नेत्यांशी गुफ्तगू केली.
शरद पवार यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. २००२च्या गुजरातमधील घडवून आणलेल्या जातीय दंगलींमध्ये एका माजी खासदारासह अनेकांना जिवंत जाळण्यात आले, त्या वेळी तेथून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर असूनदेखील मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे दंगलीत होरपळलेल्या अल्पसंख्याक समुदायाच्या संरक्षणासाठी धावून गेले नाहीत, असा आरोप पवार यांनी केला.
संग्रहित लेख, दिनांक 26th Mar 2014 रोजी प्रकाशित
सोलापुरात शक्तिप्रदर्शन करीत शिंदे व मोहिते यांची उमेदवारी दाखल
सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातून काँग्रेसचे नेते, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मंगळवारी दुपारी प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले.

First published on: 26-03-2014 at 04:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde mohite files nominations in solapur