शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाने बंडखोर गटाला पाठिंबा देण्याचं ठरवलंय असं सांगत शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली. त्यानंतर काही तासांमध्ये फडणवीस यांनी नाट्यमय घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या साऱ्या घडामोडींनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या. मात्र असं असलं तरी शिवसेना आणि शिंदे गटामधील वाद शांत होण्याची चिन्हं दिसत नाहीयत. शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी महाडमध्ये येऊन दाखवावे असा इशारा शिंदे गटातील बंडखोर आमदाराच्या पुत्राने दिलाय.

नक्की वाचा >> मुख्यमंत्री शिंदेंवरील अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; उद्या आणि परवा…

रायगड जिल्ह्यातील तीनही आमदारांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केली आहे. आता या आमदारांची त्यांच्याच मतदारसंघात कोंडी करण्याचे धोरण शिवसेनेने स्वीकारल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात जाऊन मेळावे घेणे, संघटना टिकून रहावी यासाठी प्रयत्न करणे आणि दुसऱ्या बाजूला बंडखोर आमदारांवर टिका टिप्पणी करून त्यांची बदनामी करण्याचे धोरण पक्षनेतृत्वाने स्वीकारल्याचे दिसून येत आहे. महाडचे बंडखोर आमदार भरत गोगावले यांच्यावर टीका करताना अनंत गीतेंनी ‘महाडच्या भूताला बाटली बंद करण्याची वेळ’ आलीय असं म्हटलं होतं. याच वेळी त्यांनी लवकरच महाड येथेही असाच मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले. याच पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी थेट संजय राऊत यांचा उल्लेख करत शिवसेनेला इशारा दिलाय.

नक्की वाचा >> “…मग तेव्हा युती का तोडली?”; शिंदेंना मुख्यमंत्री करुन स्वत: उपमुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांना शिवसेनेचा थेट सवाल

“शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी रायगडमधील महाडमध्ये सभा घेणार असल्याचं सांगितलं आहे. मी त्यांना आव्हान देतो की त्यांनी त्यांच्या खासगी सुरक्षेशिवाय महाडमध्ये येऊन दाखवावं. येथील शिवसैनिक त्यांना ‘प्रसाद’ दिल्याशिवाय राहणार नाहीत,” असं विजय गोगावले म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> “…तर उद्धव ठाकरेंना समर्थन करणाऱ्या त्या १६ आमदारांची आमदारकी धोक्यात येईल”; बंडखोर आमदारांकडून इशारा

अलिबागमध्ये बोलताना राऊतांची टीका…
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी अलिबाग येथे शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित होते. अलिबाग, पेण, रोहा आणि मुरुड तालुक्यातून या मेळाव्यासाठी शिवसैनिकांना बोलविण्यात आले होते. यावेळी राऊतांनी बंडखोर आमदारांवर तोंडसुख घेतले. शंभर गोठ्यातील शेण काढून आमदार महेंद्र दळवी शिवसेनेत आले होते. ते गेले, आता बैल बदलायची वेळ आल्याची टिका यावेळी त्यांनी केली. तर आल्याची टिप्पणी करत अनंत गीते यांनी भरत गोगावले यांच्यावर टीका केली.

नक्की वाचा >> मोदींचा फोन, फडणवीस अन् उपमुख्यमंत्रीपद; शपथविधीच्या काही मिनिटं आधी नेमकं घडलं काय?

आदित्य ठाकरेंनीही घेतला मेळावा…
कर्जतमधील आमदार महेंद्र थोरवे यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने बुधवारी कर्जत येथे मेळावा घेतला. या मेळाव्याला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीने गर्दी जमवून या वेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. आमदारांच्या बंडामुळे पक्ष संघटनेला कुठलाही धोका निर्माण झालेला नाही, असे  या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेने दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

नक्की वाचा >> …अन् मध्यरात्रीनंतर महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री थेट गोव्याला पोहोचले; बंडखोर आमदारांकडून शिंदेंचं जंगी स्वागत

यावेळी आदित्य ठाकरे यांनी आमदार महेंद्र थोरवेंवर टीका केली. आमदार महेंद्र थोरवे हेच विकास कामे अडवत होते. नगरपालिकांना निधी देण्यास त्यांचा विरोध होता असा दावाही त्यांनी आपल्या भाषणात केला. बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील आणि दादा भुसे यांनाही त्यांनी लक्ष्य केले.