राहाता: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी ‘कोम्बिंग व ऑल आऊट ऑपरेशन’ मोहीम राबवली. या कारवाईत अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत (पिटा) शिर्डी शहरातील चार हॉटेल्सना सील ठोकण्यात आल्याची माहिती शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली.

निरीक्षक गलांडे यांनी सांगितले की, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या आदेशानुसार व पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी पिटा कायद्यान्वये कारवाई झालेल्या हॉटेल्स सील करण्यासाठी प्रांताधिकारी माणिक आहेर यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यांची परवानगी मिळताच पोलिसांनी शिर्डी शहरातील साईवसंत विहार लॉज (सोनार गल्ली), हॉटेल साईइन (दत्तनगर, पिंपळवाडी रस्ता), हॉटेल साई वीरभद्र (सुतार गल्ली) आणि हॉटेल शीतल (निमगाव) या चार हॉटेल्सना सील ठोकण्यात आले.

या मोहिमेत इतरही कारवाया करण्यात आल्या. यामध्ये पोलिसांनी १८ अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करत ८ पुरुष आणि ६ महिलांना अटक करून न्यायालयात हजर केले. दारूबंदी कायद्यान्वये चार गुन्हे दाखल करून १२ हजार रुपयांचा मुद्देमाल, तर जुगार कायद्यान्वये एका प्रकरणात ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सन २०१३ पासून फरार असलेला आरोपी शंकर वेरणस्वामी आणि आरोपी दिनेश मोकळ यांना अटक करण्यात आल्याचे गलांडे यांनी सांगितले.

राहुरीत हॉटेल मालकास अटक

अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात हॉटेल मालक-चालक अनिकेत जाधव (वय २७, रि. शिंगवे नाईक, राहुरी) याला राहुरी पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यातील आरोपी हा पीडित अल्पवयीन मुलीस लॉजवर घेऊन गेल्यानंतर अनिकेत जाधव याने पीडितेच्या वयाची कोणतीही कागदपत्रे न तपासता लॉजची खोली उपलब्ध करून दिली. या आरोपावरून अनिकेत जाधव याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली.

राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील सर्व हॉटेल मालक, लॉज चालक यांनी, त्यांच्याकडे कुणीही ग्राहक आल्यास त्याचे ओळखपत्र, जन्माचा पुरावा घेऊन त्यावर संबंधिताची स्वाक्षरी घेऊन रजिस्टरला नोंद करावी. तसेच कोणत्याही परिस्थितीत अल्पवयीन मुलीसह आलेल्या ग्राहकास हॉटेल, लॉजमध्ये रूम उपलब्ध करून देऊ नये. अशाप्रकारे अल्पवयीन मुलीस रूम उपलब्ध करून दिल्यास व लैंगिक अत्याचाराचा गुन्हा घडल्यास भारतीय न्याय संहिता कलम ५५ तसेच बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कलम १७ अन्वये हॉटेल लॉज मालक, चालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी दिला आहे.