राहाता : शिर्डी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाल्याने इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे. जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी खासदार डॉ. सुजय विखे यांचे कट्टर समर्थक शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी थेट शिर्डीच्या वेशीवर सुजय विखे यांच्याबाबत मिश्किल टिप्पणी केलेला फलक लावल्याने शिर्डीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.शिर्डीचे नगराध्यक्ष पद राखीव झाल्याने खुल्या व ओबीसी वर्गातील इच्छुक उमेदवारांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. या पार्श्वभूमीवर कैलास कोते यांनी लावलेल्या फलकावर ‘शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला दादांनी मारलं, आई दादांच वाक्य खरं ठरलंय’ असा मजकूर झळकल्याने शिर्डीत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
नगराध्यक्ष पदासाठी चार वर्षांपासून अनेकजण प्रतीक्षेत होते. त्यासाठी इच्छुकांनी जोरदार तयारी केली होती. परंतु, नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाल्याने अनेकांचे स्वप्न व आशा धुळीस मिळाले. माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी फलकबाजी करून वातावरण गरम केले आहे. नगराध्यक्ष पदासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून असल्याने विखे यांची डोकेदुखी वाढली होती. सुजय विखे यांनी दोन महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात, ‘नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलेसाठी निघू दे, मी लोणी ते शिर्डी पायी पदयात्रा करील’, अशी मिश्कीलपणे प्रार्थना साईबाबांना केली होती. या मिश्किल टिप्पणीचा योगायोग असा झाला की, त्यांची प्रार्थना फळाला आली. नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव निघाले. विखे यांच्या या विधानाची जुनी चित्रफीत आता पुन्हा समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. या फलकाबाबत शिर्डीत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. हा फलक लावण्यामागे कोते यांचा नेमका उद्देश कोणता? याचे कोडे मात्र गुलदस्त्यात आहे. कोते यांच्या भूमिकेकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे.
नगराध्यक्ष पद राखीव झाल्याने इच्छुकांची धावपळ थंडावली आहे. विखे यांचे असलेले कट्टर समर्थक कैलास कोते यांनी खोचक फलक लावीत विखे यांच्या लोणी ते शिर्डी पदयात्रेस शुभेच्छा दिल्या आहेत. या फलकाची सुजय विखे यांनी दखल घेत शिर्डीतील स्थानिक राजकारण भाष्य केले की, ‘ऊपरवाले की लाठी मे आवाज नही रहती, बापूंची संधी हुकल्याने मलाही वाईट वाटले, मी त्यांनाच उमेदवारी देणार होतो. पण आता काय करू शकतो’, असे भाष्य विखे यांनी फलक लावल्यावर केले आहे. याबाबत कैलास कोते यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.