सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अॅड. शरद बनसोडे यांच्या प्रचार यंत्रणेपासून दूर राहिलेली शिवसेना अखेर मुंबईहून ‘मातोश्री’तून आदेश येताच सक्रिय झाली. भाजपचे माजी खासदार सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांनी शेजारच्या उस्मानाबादेत शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी केल्याचा तिढा कायम राहिला असताना शिवसेनेने अचानकपणे आपला पवित्रा बदलून भाजपबरोबर महायुतीचा धर्म पाळल्याने यात सेनेचे नेमके कोठे व कसे समाधान झाले, याचे गुपित उलगडले नाही.
सोलापूरचे  माजी खासदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांनी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महायुतीविरोधात हक्क सांगून बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेने जोपर्यंत उस्मानाबादचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत सोलापुरात भाजपचा प्रचार करायचा नाही, असा पवित्रा घेतला होता. दरम्यान, सुभाष देशमुख यांनी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला व तो पक्षश्रेष्ठींनी स्वीकारला. मात्र यासंदर्भात कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे  शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली असताना अखेर मातोश्रीवरून रात्री आदेश आल्यामुळे निवडणुकीत भाजपचा प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख पुरूषोत्तम बरडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
भाजपचे बंडखोर देशमुख यांच्या उमेदवारीमुळे उस्मानाबादेत शिवसेनेसमोर अडचण वाढली असताना त्याबाबत ठोस निर्णय न होताच इकडे सोलापुरात शिवसेना आपला पवित्रा बदलत महायुतीचा धर्म कसा पाळणार, या प्रश्नाचे उत्तर देताना बरडे यांनी मातोश्रीवरून आलेला आदेश आपण शिरसावंद्य मानतो, असे सांगितले. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शहरप्रमुख प्रताप चव्हाण, भाजपचे शहराध्यक्ष, आमदार विजय देशमुख, भाजपचे शहर सरचिटणीस प्रा. अशोक निंबर्गी आदी उपस्थित होते.