कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा विरुद्ध शिवसेना अशी राजकीय कुस्ती चांगलीच रंगल्याचे दिसत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल(शनिवार) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरात सभा घेत शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन सभा घेत फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी हिंदुत्वासह विविध मुद्य्यांवरून देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर निशाणा साधला. शिवसेनेने आपला झेंडा, रंग, विचार, नेता कधीच बदलला नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला उद्देशून बोलून दाखवलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंदुहृदयसम्राटांबद्दल जर तुम्हाला एवढंच प्रेम असेल, तर… –

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “देशात भाजपाने एक बनावट हिंदुहृदयसम्राट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जो फसला लोकानी झिडकारला. हिंदुहृदयसम्राट म्हटल्यानंतर नाव आणि चेहरा एकच येतो, तो म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. दुसरं कोणतही नाव येत नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी ते होऊच शकत नाही. हिंदुहृदयसम्राट म्हणजे हिंदू अडचणीत असताना कसलीही परवा न करता मदतीला धावून येणारा असतो, तोच हिंदुहृदयसम्राट होऊ शकतो. त्यावेळेला घरी बसून नंतर तुम्ही येणार आणि लोकांना माध्यमांवर प्रतिक्रिया देणार, हे प्रतिक्रिया सम्राट होऊ शकतात पण हिंदुहृदयसम्राट होऊ शकत नाही. मग कशाला तुम्ही उगाच या गोष्टी सांगून राजकारण करत आहात. आता म्हणे सोनिया गांधींचा फोटो दिसतो, पूर्वी अटलजींचा देखील असायचा, नरेंद्र मोदींचा लोकसभा, विधानसभा निवडणुकीपर्यंत होता. तुम्ही ही परिस्थिती निर्माण केली.”

हिंदुत्व, हिंदुहृदयसम्राट अन् भगव्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपावर डागली तोफ!

“हिंदुहृदयसम्राटांबद्दल जर तुम्हाला एवढं प्रेम असेल, तर मधल्या काळात मी बोललो की तुम्हीच त्यांच्या नावासमोर जनाब ही उपाधी लावण्याची नीच प्रयत्न केला होता. जर का तुम्हाला हिंदुहृदयसम्राटांबद्दल एवढच प्रेम आहे, असं तुम्ही म्हणता तर मग त्याच हिंदुहृदयसम्राटाच्या खोलीत जिथे आम्ही त्याचं मंदिर मानतो, आज देखील ती खोली तशीच आहे जशी त्यांच्यावेळी होती, त्या खोलीत अमित शाहांनी मला दिलेलं वचन तुम्ही का मोडलत, याचं उत्तर तुम्ही का नाही देत? हिंदुहृदयसम्राटांबद्दल तुम्हाला जर एवढं प्रेम आहे तर मग नवी मुंबई विमानतळाला हिंदुहृदयसम्राटांचं नाव द्यायला तुमचा एवढा विरोध का? द्या ना त्याला नाव.”

तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व नाही सोडलं – उद्धव ठाकरेंचं भाजपावर टीकास्त्र!

तसेच, “भगव्याच्या रक्षणासाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत असं सांगितलं जातं, कोणता भगवा? हा छत्रपती शिवरायांच्या जो भगवा आहे तो खरा भगवा आहे, तुमच्या सोयीप्रमाणे त्याच्याबाजूला हिरवा, निळा, पिवळा, काळा लावाल आणि तो भगवा म्हणून म्हणाल तर तो भगवा आम्ही काही स्वीकारणार नाही. तुमचा भगवा हा खरा भगवा नाहीच. अस्सल भगवा हा छत्रपती शिवरायांचा आणि साधुसंतांचा व आमच्या वारकऱ्यांचा भगवा आहे. त्याला दुसरा कोणताही रंग लागलेला नाही, हा आमचा भगवा. आता हा देखील भगवा तुम्ही खोटा ठरवायला लागलात? म्हणजे हा भगवा खोटा आणि तुमचा भगवा खरा?, निदान एक गोष्ट लक्षात ठेवा शिवसेना १९६६ मध्ये जन्माला आली, तेव्हापासून शिवसेनेने आपला झेंडा, रंग, विचार, नेता बदललेला नाही. आज देखील आमच्या मनात आमच्या होर्डिंग्जवर सर्वत्रच शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच आहेत. दुसरा कोणताही नेता, विचार, रंग आमच्याकडे नाही. पण तुमचा जन्म झालेला जनसंघ तेव्हाचा तुमचा झेंडा आठवा, त्यानंतर तुम्ही गेलात जनता पक्षात, त्यानंतर तुम्ही बाहेर पडलात तो भाजपा तेव्हा आधीची तुमची वाटचाल होती गांधीवादी समाजवाद. मग शिवसेना प्रमुखांना एक वेगळी भगवी दिशा दाखवली. मग तुम्हाला लक्षात आलं की या भगव्या दिशेने गेलं तर दिल्लीपर्यंत पोहचू शकतो. मग तुम्ही हिंदुत्वावरती आलात.” अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला.

तुमच्या किती होर्डिंग्जवर अटलजी आणि अडवाणी आहेत? –

याचबरोबर, “आज आमच्या हृदयात आणि होर्डिंग्जवरती शिवसेनाप्रमुख तर आहेतच, तुमच्या किती होर्डिंग्जवर अटलजी आणि अडवाणी आहेत? अटल बिहारी वाजपेयी एकतरी होर्डिंग्जवर दिसत आहेत का? अडवाणींनी यांना ही भगवी दिशा दाखवली कुठे आहेत अडवाणी? ना अटलजींचा पत्ता ना अडवाणींचा पत्ता. सरपंचपदासाठी देखील एकच फोटो आणि पंतप्रधानपदाच्यावेळी देखील एकच फोटो. दुसरे तुमच्या नेत्यांचे फोटो गेले कुठे?” असा सवाल देखील उद्धव ठाकर यांनी यावेळी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena has never changed its flag color thought leader chief minister uddhav thackeray msr
First published on: 10-04-2022 at 19:18 IST