शिवसेनेत पडलेली फूट, एकनाथ शिंदे यांना बहुसंख्य आमदारांचा मिळालेला पाठिंबा, उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती कमी होणे, शिवसेनेचे भवितव्य आणि विधानसभा निवडणुकीतील जागावाटप या साऱ्या प्रश्नांवर शिवसेना नेते व उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात परखड मते मांडली. त्याचा हा सारांश :

शिवसेनेत बंड का झाले याची अनेक कारणे आहेत. एकनाथ शिंदे व अन्य नेत्यांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्यात आले होते. शिंदे यांना एवढ्या आमदारांचा पाठिंबा का मिळाला? कारण आमदारांमध्येही नाराजी होती. त्यातूनच मीसुद्धा शिंदे यांना साथ दिली. तत्पूर्वी मी शिवसेना भवनात जाऊन नेतेमंडळींना मी सूरतला चाललो हे सांगितले होते. मी तेथे फ्रँकी खाल्ली अशी टीका झाली. हो, मी शिवसेने नेत्यांबरोबर तेथे खानपान केले. पण सूरतला जातो हे उघडपणे सांगितले. उद्धव ठाकरे यांना भेटून वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शानस आणून देणार होतो. पण ठाकरे यांची भेट काही होऊ शकली नाही. मी ११ वर्षे शिवसेनेत होतो. सहा-सहा महिने उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नसत. मी सूरतला चाललो हे साऱ्यांना सांगून शिवसेना भवनातून बाहेर पडलो. मला कोणीही आडवले नाही. खाली उतरून मी गाडीत बसून सूरतच्या दिशेने रवाना झालो. मी शिंदे यांना साथ देऊ नये, असे माझे मन वळविण्याचे प्रयत्न झाले. शिंदे यांच्याकडील नगरविकास आणि रस्ते विकास मंडळ ही दोन खाती देण्याची तयारी दर्शविण्यात आली. मी त्याला ठामपणे नकार दिला. कारण मला ओसाडगावची पाटीलकी नको होती.

जागावाटपात पडती भूमिका नाही

शिवसेनेने तीन खासदारांना उमेदवारी नाकारली म्हणून बरीच ओरड झाली. भाजपच्या दबावापुढे मुख्यमंत्री झुकले, असे चित्र रंगविले गेले. पण जागावाटपात १५ जागा पदरात पाडून शिंदे यांनी आपली ताकद दाखवून दिली. भाजपने केलेल्या सर्वेक्षणाची भीती दाखवून शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार बदलवले, या आरोपात काही तथ्य नाही. ते सर्वेक्षण आम्ही पण केले होते. आमच्या काही उमेदवारांना अडचण असल्याचे त्यात जाणवले. भावना गवळी, कृपाल तुमाने, हेमंत पाटील यांना आम्ही वास्तविकता लक्षात आणून दिली. उमेदवारी दिली नसली तरी त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल. उमेदवार बदलला असला तरी शेवटी उमेदवार शिवसेनेचाच राहिला. जागावाटपात आम्हाला भाजपने सापत्न वागणूक दिलेली नाही. बंडानंतर आमच्या गोटात १३ खासदार आले. त्या जागा तर आमच्या कायम राहिल्याच आहेत. अधिकच्या दोन जागा मिळाल्या आहेत. आमच्या युतीत आता तीन भागीदार आहेत. ४ जागा राष्ट्रवादीला गेल्या. भाजप मोठा पक्ष आहे, हे मान्यच केले पाहिजे. मोदींची आजही जादू आहे. तरुणाईमध्ये मोदींचा करिष्मा कायम आहे. त्यामुळे जागा वाटपात आम्ही पडती भूमिका घेतली असे नाही. लोकसभेत शिवसेनेला खासदारांचे संख्याबळ कायम राहिले. शिवसेनेचे सर्व १८ खासदार आमच्याबरोबर आले असते तर तेवढ्या जागा निश्चितच मिळाल्या असत्या. लोकसभेतील जागावाटपावरून विधानसभेच्या वेळी शिवसेनेच्या पदरात नक्कीच चांगल्या जागा मिळतील. शिंदे यांना शिवसेनेचे ४० तर अपक्ष ९ आमदारांनी साथ दिली. या सर्व जागा आम्ही कायम राखूच पण त्यापेक्षा अधिक जागा मिळतील हे मी ठामपणे सांगू शकतो. फक्त नक्की संख्याबळ किती असेल हे जाहीर करणे योग्य ठरणार नाही.

हेही वाचा >>>‘शिंदे यांच्याकडील नगरविकास, रस्ते विकास खाती मी नाकारली’

आदित्यला मुख्यमंत्री करणे एवढेच लक्ष्य

उद्धव ठाकरे हे आपल्यावर कसा अन्याय झाला असे सांगत स्वत:बद्दल सहानुभूती निर्माण करीत आहेत. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. हे त्यांच्याच मुलाखतीतून स्पष्ट झाले आहे. स्वत:च्या मुलाला मुख्यमंत्री करणे एवढाच त्यांचा एककलमी कार्यक्रम होता. महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या वेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी मंत्रिमंडळात आदित्यचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळेस काही आमदारांनी आदित्य ठाकरे यांच्या समावेशास विरोध केला होता. पण उद्धव ठाकरे कोणाचेच ऐकून घेत नसत. त्यातूनच आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली.

उमेदवारीचा घोळ टाळता आला असता

महायुतीत जागावाटपावरून घोळ नाही पण विलंब जरूर झाला. हा विलंब टाळला असता तर अधिक योग्य झाले असते. कारण उमेदवारांना प्रचारासाठी अधिक कालावधी मिळाला असता. भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केलेल्या या मताशी मी सहमत आहे. जागावाटपास विलंब का लागला याचे उत्तर मी देऊ शकत नाही. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजप नेत्यांशी संवाद साधत होेते. ठाणे, नाशिक, दक्षिण मुंबई, वायव्य मुंबई या मतदारसंघांमध्ये आधी उमेदवार जाहीर झाले असते तर अधिक चांगले झाले असेत.

घटना बदलण्याच्या चर्चेचा फटका

लोकसभा निवडणुकीत लाट नाही, पण मोदी यांचे वलय संपलेले नाही. तरुण, महिला रांगा लावून मोदींना मतदान करत आहेत. राम मंदिराचा मुद्दा चालतो आहे. मुस्लिम समाज नाराज असल्याचा दावा करण्यात येत असला तरी तरी तीन तलाक बंदीमुळे मुस्लिम महिला भाजपला मतदान करत आहेत. आरक्षण आणि कुणबी दाखले यामुळे मराठा समाज खूष आहे. इतर मागासवर्गाच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावलेला नाही. त्यामुळे ओबीसी आमच्यापासून दुरावला यात काही तथ्य नाही. पण जातीपातीच्या आधारे मतदारांचे ध्रुवीकरण करण्यात विरोधकांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. चारशे पारचा जो भाजपचा नारा होता, त्याचा संदर्भ देऊन राज्यघटना बदलवण्याची भीती काँग्रेसकडून मतदारांना दाखवली जात आहे. या अपप्रचाराचा फटका महायुतीला काही प्रमाणात बसतो आहे. याला काँग्रेस जबाबदार आहे. खोटे पण रेटून बोलण्याची काँग्रेसची आजपर्यंतची परंपराच आहे.

मुंबईकर जाब विचारतील

आमच्या सरकारने मुंबईत सिमेंट काँक्रेटचे रस्ते करण्याचे सात हजार कोटींच्या निविदा काढल्या. पण, पूर्वी मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे बुजवायला साडेतीन हजार कोटी खर्ची पडत होते. पुन्हा पुढच्या वर्षी खड्डे आहेतच. आता सिमेंट काँक्रीटचे रस्ते होतील. त्यामुळे या रऱ्त्यावर पाचदहा वर्षे तरी खड्डे पडणार नाहीत. त्यामुळे मुंबईकरांचा पैसा वाचला जाणार आहे. एकदा मुंबईतील सर्व रस्ते सिमेंटचे होवू द्या. खड्ड्यावर तुम्ही किती पैसे उधळत होतात, याचा जाब मुंबईकर ठाकरे गटाला नक्कीच विचारतील.

दोन वर्षात कोकणचा विकास

कोकणात विमानतळ, शिवसृष्टी, छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्र, मँगो प्रकल्प, संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र इतके काही एकनाथ शिंदें मुख्यमंत्री झाल्यानंतर उभे केले आहे. मी आजपर्यंत कोणत्याही प्रकल्पाला विरोध केलेला नाही. कोकणच्या इतर भागात प्रकल्पाला विरोध झाला तर मी माझ्या मतदारसंघात आमंत्रण देतो. त्यामुळे माझ्या रत्नागरी विधानसभा मतदारसंघात आज तीन आंतरराष्ट्रीय जेट्टी उभ्या राहिल्या आहेत. विकास हे माझे ध्येय आहे. पण ठाकरे गटाने कायमच कोकणाच्या विकासाला विरोध केला.

भ्रष्टाचार केला तर तपास होणार

आम्ही मूळ शिवसेना पक्ष ठरलो आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आम्हाला मिळाले, यात केंद्र सरकाचा हात वगैरे होता, असे काही नाही. आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जी भूमिका मांडली, ती त्यांना पटली. केंद्रीय तपास संस्थांचा विरोधकांना नामोहरम करण्यासाठी वापर होतो आहे, या महाविकास आघाडीच्या दाव्यामध्ये जराही तथ्य नाही. भ्रष्टाचार केला असेल तर तपास होणारच. इतक्या नेत्यांवर कारवाई होते, याला काही अर्थ आहे. विरोधकांनी या मुद्यावर उगाच वातावरण तापवले आहे. त्याचा काहीसा फटका आम्हाला निवडणुकीत बसतो आहे.

४० पेक्षा अधिक जागा जिंकू

लोकसभेत राज्यात महायुती नक्कीच ४० पेक्षा अधिक जागा जिंकेल. ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानात महायुतीला अनुकूल असेच मतदान झाले आहे. विरोधकांकडे कोणताही कार्यक्रम नाही. यामुळेच जातीय आधारावर टीकाटिप्पणी विरोधकांकडून केली जात आहे.

ठाकरे गट विकासविरोधी

उद्धव ठाकरे गट म्हणजे विकासाला विरोध, असे समीकरण तयार झाले आहे. वाढवण बंदर, अरामको तेलशुद्धीकरण प्रकल्प, जिंदालचा स्टील उद्याोग, समृद्धी महामार्ग मुंबईतले मेट्रोचे कारडेपो कोकणातला कोकाकोला प्रकल्प, अगदी जुना एन्रॉन प्रकल्पाचा इतिहास बघा. जिथे नोकऱ्या निर्माण होतात, जिथे विकास होतो, तिथे यांचा विरोध असतो. तो काही काळाने मावळतोसुद्धा. हा विरोध का मावळतो याचा शोध घेतला पाहिजे. आता नाणारच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध होता की यांचा हे कळत नाही. ठाकरे गटाचे आमदार व खासदार यांच्या नाणार प्रकल्पबाबत भूमिका परस्परविरोधी होत्या. बारसू तेलशुद्धीकरण प्रकल्प आहे ७५०० एकरावर. त्यामध्ये ८०० एकर परप्रांतियांच्या जमिनी आहेत. अजून तिथे भूसंपादन झालेले नाही. आपण केवळ जमिनी अधिसूचित केल्या आहेत. माती परीक्षणाचा अहवाल आलेला नाही. अहवाल आल्यानंतर प्रकल्प करायची की नाही, हे ठरणार आहे. पण ठाकरे गटाने कांगावा सुरू केला आहे. प्रकल्पाला विरोध ही ठाकरे गटाची ओळख आहे.