शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. त्यांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी सुरतमध्ये जावून एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मात्र, या चर्चेतून अद्याप कोणताही मार्ग निघाला नसून चर्चा निष्फळ ठरल्याचं दिसत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे पुढे नेमकं कोणतं पाऊल उचलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काही वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, आज मध्यरात्री शिवसेना आमदारांचं सुरतमधील हॉटेलमधून एअरलिफ्ट होण्याची शक्यता आहे. त्यांना अहमदाबाद किंवा मुंबईपासून २७०० किमी दूर आसाममधील गुवाहटी येथे घेऊन जाण्यात येणार असल्याचं कळत आहे. संबंधित आमदारांना घेऊन जाण्यासाठी सुरत विमानतळावर तयारी करण्यात आली आहे. याठिकाणी तीन चार्टर्ड विमानं सज्ज असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरत विमानतळ आणि शिवसेना आमदार मुक्कामी असलेल्या सुरतमधील हॉटेल परिसरात पोलिसांच्या हालचाली वाढल्याचं समजत आहे. बंडखोरी फसू नये, यासाठी आमदारांना मुंबईपासून २७०० किमी दूर गुवाहटीला घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे आज रात्री महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे.