जालना : जालना तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ पुन्हा एकदा शिवसेनेच्या (शिंदे) ताब्यात आला आहे. विशेष म्हणजे संचालक मंडळाच्या बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्षास बाजूला ठेवून दोन्ही राष्ट्रवादी (शरद पवार व अजित पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेस या पक्षांशी समझोता करून शिवसेनेचे (शिंदे) उपनेते अर्जुन खोतकर यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
निवड झालेल्या एकूण पंधरा संचालकांमध्ये विष्णू भुतेकर आणि दलसिंग पवार (राष्ट्रवादी- अजित पवार), तुळशीराम गिराम (शिवसेना ठाकरे), ज्ञानेश्वर डुकरे (काँग्रेस) आणि कल्याण सांगोळे (राष्ट्रवादी-शरद पवार) या चार संचालकांचा समावेश आहे. खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अच्युत कदम यांच्यासह शिवसेनेच्या (शिंदे) तेरा उमेदवारांचा बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांमध्ये समावेश आहे.
आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते रविवारी नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना खोतकर म्हणाले की, माजी सभापती कदम यांच्या नेतृत्वाखाली लढविलेल्या या निवडणुकीत संपूर्ण जागा बिनविरोध निवडून आल्या असून, पुन्हा एकदा आमचे बहुमत आले आहे. काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याणराव काळे, राष्ट्रवादीचे (अजित पवार) जिल्हा अध्यक्ष अरविंद चव्हाण, शिवसेनेचे (ठाकरे) जिल्हा प्रमुख भास्करराव अंबेकर, राष्ट्रवादीचे (शरद पवार) माजी मंत्री राजेश टोपे आणि आमदार हिकमत उढाण यांचे सहकार्य ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी लाभले. जालना तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी शासन दरबारी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन खोतकर यांनी यावेळी दिले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, शिवसेनेचे (शिंदे) जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.