रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील राजकीय घडामोडीना वेग येण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी राजीनामा देत ठाकरेच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ म्हटले आहे. येत्या काही दिवसात शिवसेना ठाकरे गटाला आणखीन मोठे धक्के बसणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. याची सुरुवात साळवी यांच्या राजिनाम्याने झाल्याचे कार्यकर्त्यांमधून चर्चिले जात आहे. शिवसेना फुटी नंतर रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणात मोठे बदल बघायला मिळाले होते. मात्र या शिवसेना फुटीचे पडसाद अजुनही रत्नागिरी जिल्ह्यात दिसून येत आहेत.

रत्नागिरीतील राजकीय घडामोडींमध्ये आता नवीन वळण घेण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरीचे ठाकरे गटाचे शिवसेना तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात आता चांगलीच खळबळ उडाली आहे. तालुका प्रमुख बंड्या साळवी यांच्या राजीनामामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद आता पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. बंड्या साळवी आता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. राजिनामा दिल्यानंतर बंड्या साळवी यांनी, शिवसेनेतील फुटीनंतर येथील शिवसैनिक विकासापासून वंचित राहिला असल्याचे सांगत, आपण राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा-तेजस एक्सप्रेसचे इंजिन बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

तसेच नवीन नेतृत्वाला संधी मिळावी म्हणून राजीनामा दिल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. मात्र बंड्या साळवी हे ठाकरेच्या शिवसेनेवर नाराज असल्याचे वारंवार उघड झाले आहे. तसेच ते उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्या जवळचे असल्याचे चर्चिले जात असतानाच विधानसभा निवडणुकीच्या आमदारकीचे तिकिट न मिळाल्याने साळवी यांनी ठाकरेच्या शिवसेनेतून बाहेर पडण्याचा तेव्हाच निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटातील नाराज लोकांचा लवकरच शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचे आमदार उदय सामंत यांनी आधीच सांगून रत्नागिरीच्या राजकारणात मोठा धमाका उडवून दिला होता. त्याची सुरुवात आता बंड्या साळवी यांच्या राजिनाम्याने झाल्याचे सांगितले जात आहे. साळवी यांच्या पाठोपाठ आणखी काही नाराज नेते व कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.

आणखी वाचा-फलटणमधील मृतदेहाचे अवशेष चारही दिशांना फेकले, अंधश्रद्धेतून महिला खून प्रकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रत्नागिरीतील या राजकीय उलथापालथी नंतर पुढिल निर्णय बंड्या साळवी हे दोन दिवसात कार्यकर्त्यांशी बोलून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सत्ता असेल तरच आम्ही जनतेची कामे करू शकतो आणि सत्ते शिवाय ही कामे होणार नाहीत असे साळवी यांनी स्पष्ट केले आहे. ठाकरे गटातील नाराजाचा याच आठवड्यात शिंदे गटात पक्ष प्रवेश होणार असल्याचे आता सांगितले जात आहे.