रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील सर्व खड्डेमय रस्त्यांना कंटाळून ठाकरेंच्या शिवसेना पक्षाने मारुती मंदिर येथे १५ मिनिटांचे चक्का जाम आंदोलन केले. रस्ते नाही फक्त खड्डे आणि वेदना, विठ्ठलाच्या पायी वीट, रस्त्याविना आलाय इट, दिन नको अच्छे आधी रस्ते पाहिजेत अच्छे, असे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेत आपला रोष व्यक्त केला. यावेळी या चक्काजाम आंदोलनात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला.
आंदोलना दरम्यान नागरिकांनी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामध्ये, डांबरचोराचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, पालकमंत्री उदय सामंत हाय हाय, रत्नागिरी शहराची व पाणीयोजनेची दुर्दशा करणाऱ्यांचा निषेध असो अशा घोषणांनी मारुती मंदिर परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनासंबंधी शुक्रवारी पत्रकार परिषद झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन १५ दिवसांत खड्डे भरण्याचे आश्वासन दिले. जर खड्डे भरले नाहीत तर सोळाव्या दिवशी आक्रमक आंदोलन करू, असा इशारा यावेळी शिवसेना उपनेते बाळ माने यांनी दिला.
त्यानंतर मारुती मंदिर येथे मुख्य मार्गावर दोन मिनीटे वाहनचालकांना थांबवून बाळ माने यांनी संवाद साधला. हे आंदोलन आपल्या सर्व जनतेसाठी आहे. आम्ही राज्य सरकारचा निषेध करतो. तसेच डांबरचोर पालकमंत्र्याचा निषेध करतोय. पक्षाच्या पलीकडचे आंदोलन असून लोकांना होणारा त्रास शासनाला कळण्यासाठीच आंदोलन असल्याचे सांगितले. त्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले.
पत्रकारांशी बोलताना बाळ माने यांनी सांगितले की, आम्ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर काही लोकांनी पत्रकार परिषद घेतली. जपानपासून दौरे करणाऱ्या उद्योगमंत्र्यांच्या रत्नागिरी शहरातील रस्ते अत्यंत खराब, निकृष्ट दर्जाचे आहेत. आम्ही रहदारीला अडथळा न करता सनदशीर मार्गाने प्रतिकात्मक आंदोलन केले. दुचाकी, रिक्षाचालक, मालवाहतूक करणारे वाहनचालकांचे खड्ड्यांमुळे नुकसान होत आहे. ५ वेळा निवडून आलेल्या लोकप्रिय पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातले रस्ते दयनीय का? यामुळेच सामान्य माणूस निषेधासाठी रस्त्यावर उतरलाय.
सनदशीर मार्गाने आंदोलन केले आहे. सरकारला अल्टीमेटम देतोय की, १५ दिवसांत रस्ते चकाचक करू असे आश्वासन दिले आहे. १६ व्या दिवशी खड्डा दिसला तर त्या खड्ड्यात तुडवू. भूलथापा मारू नका, रत्नागिरीकर सहनशील व शांतताप्रिय आहेत. नगरपालिकेचे ९५ किमीचे रस्ते असून १० किमी कॉंक्रिटचे काम आर. डी. सामंत कंपनीकडे आहे. स्मार्ट सिटीतील २५ किमीचे रस्ते एमआयडीसी करणार आहेत. परंतु सर्वच रस्त्यांची दयनीय स्थिती झाली आहे.
यावेळी आंदोलनस्थळी मोठा पोलीस फौजफाटा पाहून बाळ माने व शहर पोलीस निरीक्षक पाटील यांच्यात वादावादी झाली. आम्ही काय शहरी नक्षलवादी आहोत का, एवढे पोलीस कशाला, एवढे आंदोलकसुद्धा नाहीत. तुम्हाला शहरात गाड्या चालवताना त्रास होत नाही का, की फक्त सामान्य माणसालाच त्रास होतो. आंदोलन करणे हा लोकशाहीने दिलेला हक्क आहे. मी सुद्धा सामाजिक, राजकीय क्षेत्रात अनेक वर्षे काम करतोय. गालबोट लागेल अशी भूमिका घेऊ नका, असे माने यांनी ठणकावून सांगितले. त्यावेळी आम्ही लोकांसाठीच आंदोलन करत आहोत, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे व शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी मध्यस्थी केली.