जालना – औद्योगिक आणि व्यापारी ग्राहकांवर लावण्यात यावयाचे वीज बिल अधिभार प्रत्यक्षात घरगुती ग्राहकांवर लाद‌ले जात असल्याची तक्रार शिवसेनने ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) केली आहे. पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ‘महावितरण’चे स्थानिक कार्यकारी अभियंता व्यंकटेश पेन्शनवार यांना घेराव घालून ही तक्रार केली आणि ग्राहकांच्या संदर्भात अनेक मागण्या केल्या. घोषणाबाजी करीत घरगुती ग्राह‌कांवरील अधिभार मागे घेण्याच्या आवश्यकतेकडे त्यांचे लक्ष वेधले.

ग्राहकांवरील अन्यायकारक अधिभार आणि वाढीव देयके रद्द करावीत, स्मार्ट मीटर संदर्भातील तक्रारींची चौकशी करावी, विलंबाने देयक मिळाल्यावर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याऐवजी त्यासाठी पंधरा दिवसांची मुदत द्यावी, कृषी ग्राहकांना अधिभारातून सवलत देऊन त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी किमान तीस दिवसांची मुदत द्यावी, स्मार्ट मीटर भारतीय मानक ब्युरो प्रमाणित असल्याची खात्री करावी इत्यादी बारा मागच्या यावेळी करण्यात आल्या.

मासिक ९६ यूनिट इतका कमी वापर असूनही ग्राहकास ८५४ रुपयांचे वीज बिल देण्यात आले आहे. यामध्ये उर्जा शुल्क अंदाजे चारशे रूपये असून उर्वरित रक्कम अधिभार आणि स्थीर शुल्काच्या स्वरूपात आकारली आहे. स्मार्ट मीटर बसविण्याची योजना खासगी कंपनीच्या फायद्यासाठी राबविण्यात येत आहे की काय याविषयी शंका येत आहे. शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांचा अधिभार आणि स्थीर शुल्कावर मर्यादा घालून संरक्षित दर लागू करण्याची आवश्यकता आहे, असे अंबेकर यांनी यावेळी सांगितले.