सांगली : ओसंडून वाहणारा तरुणाईचा उत्साह, लोकगीतांच्या तालावर ठेका आणि टाळ्या, शिट्ट्यांचा पाऊस अशा जल्लोषी वातावरणात मिरजेतील डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या प्रांगणात शिवाजी विद्यापीठाच्या ४५ व्या युवा महोत्सवाची सुरुवात झाली. या महोत्सवामध्ये सांगलीसह कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील ३ हजारांहून अधिक महाविद्यालयीन युवक-युवती सहभागी झाले असून, तीन दिवसांच्या महोत्सवात विविध ३६ कला प्रकारात ही स्पर्धा होत आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवाजी विद्यापीठाच्या ४५ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे उद्घाटन आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे होते. आमदार खाडे यावेळी म्हणाले, तंतुवाद्याचे माहेरघर असलेल्या मिरज शहरास ३३ वर्षांनंतर मिळाली, याचा निश्चितच आनंद होत आहे. या महोत्सवातून अनेक गायक, वादक, कलाकार तयार होत असतात. नव्या पिढीसाठी ही मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी केले.
उद्घाटन कार्यक्रमास आमदार इद्रिस नायकवडी, शिवाजी व्यवस्थापन परिषदेचे पदाधिकारी डॉ. आर. डी. ढमकले, डॉ. एस. जी. परुळेकर, डॉ. टी. एस. चौगले, डॉ. एस. डी. जाधव, डॉ. देवानंद सोनटक्के, डॉ. आर. एच. अतिग्रे, डॉ. मिलिंद हुजरे, माजी महापौर किशोर जामदार, विजय धुळूबुळू आदी उपस्थित होते.
या महोत्सवामध्ये लोकसंगीत वाद्यवृंद, लोककला, प्रहसिका, एकांकिका, पथनाट्य, मराठी, हिंदी, इंग्रजी वक्तृत्व, वादविवाद, शास्त्रीय सुरुवाद्य, नाट्य संगीत, एकल लोकवाद्य वादन, शास्त्रीय नृत्य, एकपात्री अभिनय, नकला भित्तीचित्र निर्मिती, मातीकाम, व्यंगचित्र, लघुपट, पाश्चिमात्य समूहगीत, भारतीय समूहगीत, लोकनृत्य, मुकनाट्य, एकांकिका, पाश्चिमात्य एकल गायन, पाश्चिमात्य एकल वादन, सुगम गायन, शास्त्रीय तालवाद्य, शास्त्रीय गायन, स्थळ चित्रण, स्थळ छायाचित्रण, फोटोग्राफी, कातरकाम, मेहंदी रचना, रांगोळी या स्पर्धा होणार आहेत. शनिवार दि. २० सप्टेंबर रोजी शोभायात्रा व समारोप होणार आहे.