आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियुक्त केलेल्या बांठिया आयोगाचा अहवाल न्यायालयाने मान्य केला आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देत येत्या दोन आठवड्यात महाराष्ट्रात निवडणुका जाहीर करा, अशा सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत.

ओबीसी आरक्षणावरून आता महाविकास आघाडी आणि भाजपात श्रेयवादाची लढाई रंगताना दिसत आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ओबीसी आरक्षणाबाबतच्या निकालावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांना प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलं की, “आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ओबीसी समाजाला न्याय मिळाला याचे समाधान आहे. ही श्रेय घेण्याची लढाई अजिबात नाही. कारण सर्वसामान्य जनतेच्या, विशेषत: दुर्बल समाजाच्या भल्यासाठी काम करणं हे कुठल्याही सरकारचे कर्तव्यच असतं. म्हणूनच ओबीसी आरक्षणासाठी अगदी पहिल्यापासून महाविकास आघडीतले आम्ही सर्व पक्ष मनापासून प्रयत्न करत होतो.”

हेही वाचा- “आधी पाप स्वीकारा, मग श्रेय घ्या” ओबीसी आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर टीका

“हा तिढा अवघड होता. पण तो सोडवण्यासाठी आम्ही त्यावेळेस विरोधी पक्ष, संघटना या सर्वांशी वारंवार चर्चा करून त्यांनाही विश्वासात घेतले होते. जयंत बांठिया यांच्यासारखा अनुभवी वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या टीमने हे शिवधनुष्य पेलले, त्याबद्दल त्यांनाही जितके धन्यवाद द्यावे तितके कमीच आहेत. यामध्ये आयोगाचे सर्व सदस्य तर अतिशय मेहनतीने काम करत होतेच. शिवाय राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेतील सर्व घटकांनी देखील सर्वतोपरी प्रयत्न केले” अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

हेही वाचा- “मविआच्या नेत्यांनी घोटभर पाण्यात बुडून मरावं” ओबीसी आरक्षणावरून चंद्रशेखर बावनकुळे यांचा खोचक टोला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे त्यांनी सांगितलं, “खरंतर सगळ्यांनीच ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे, यावर लक्ष केंद्रीत करून एक चांगला लढा दिला. त्यामुळे महाराष्ट्राने केलेल्या प्रयत्नांना यश आले. मी आज मुख्यमंत्री नसलो तरी आमच्या काळात यावर सर्वानुमते जी पाऊले उचलण्यात आली होती, तिला यश मिळालं यासारखे समाधान नाही.”