मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाला न घाबरता संकाटाचा सामना करा असं आवाहन राज्यातील जनतेला केलं आहे. विधानसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी कशा पद्धतीने तयारी सुरु आहे याची सविस्तर माहिती दिली. भयभीत न होता संकटाचा मुकाबला केला पाहिजे. भयभीत झाल्याने चुका होतात. ज्या काही सूचना देण्यात आल्या आहेत त्यांचं पालन केलं पाहिजे. शाळा, रेल्वे, बसेस येथे जाहिरातीच्या माध्यमातून लोकांना योग्य सूचना देत जागरुकता निर्माण करण्यास सांगण्यात आलं आहे अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

“दर दिवसाआड मी आरोग्य खात्याच्या बैठका घेत आहे. महिन्याभरापुर्वी या बैठकांना सुरुवात झाली. सुरुवातीला दोन-तीन ठिकाणीच तपासणी करण्याची सुविधा होती. पण आता मुंबई, पुणे, नागपुरात ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यामुळे रोगाचं लवकर निदान होईल आणि उपचार करु शकतो,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

“मुंबई, पुणे, नागपूर सहित आपल्या राज्यात जिथे आंतरराष्ट्रीय विमानं येतात तिथे सगळीकडे काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. तसंच विमानात साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही काळजी घेण्यास सांगण्यात आलं आहे. एखादा प्रवासी विमानात व्हायरस सोडून गेलेला असेल तर सफाई कर्मचाऱ्याच्या माध्यमातून तो पसरु शकतो. यासाठी त्यांना मास्क वैगेरे गोष्टी पुरवण्यास सांगण्यात आलं आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

मास्कचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तसंच खासगी रुग्णालयांना वॉर्ड उभारण्याची विनंती करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

होळी साजरी करु नका
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपण होळी साजरी न करण्याचा निर्णय जाहीर केला. याआधी स्वाईन फ्लू आल्यानंतर दहीहंडीचा उत्सव रद्द करण्यात आला होता. होळी महत्त्वाचा सण आहे. अमंगल होळीत खाक होतात असं म्हणतात. करोना व्हायसरचं संकट होळीत जळून खाक व्हावं हीच प्रार्थना आहे. पुढील काही दिवस आपण सर्वांना काळजीपूर्वक वागण्याची गरज आहे. गरज नसेल तिथे गर्दी करु नका,’ असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी केली जात आहे. मात्र त्यासाठी कर्चमाऱ्यांची संख्या कमी पडत असल्याने वाढवली जात आहे. जेणेकरुन त्यांच्याव जास्त भार येऊ नये. पंचतारांकित हॉटेल्सनाही सूचना देण्यात आल्या आहेत. परदेशीयांची तपासणी झाली आहे की नाही याची खात्री करावी अशी माहिती उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली.