दुष्काळी स्थितीच्या पाश्र्वभूमीवर विविध योजनांची अंमलबजावणी किती परिणामकारकरीत्या होत आहे, याची माहिती शिवसेनेचे आमदार-खासदार, तसेच मंत्र्यांकडून उद्या, शनिवारी मराठवाडय़ात तालुका पातळीवर घेतली जाणार आहे. त्यानंतर रविवारी जालना येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत होणाऱ्या बैठकीत योजनांच्या अंमलबजावणीबाबत मराठवाडय़ातील तालुकानिहाय अहवाल संबंधित लोकप्रतिनिधी सादर करतील.

रविवारी दुपारी साडेतीन वाजता येथे होणाऱ्या मेळाव्यात ठाकरे यांच्या हस्ते जिल्हय़ातील एक हजार गरजू शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये याप्रमाणे मदतीचे वाटप शिवसेनेच्या वतीने केले जाईल. त्यानंतर होणाऱ्या बैठकीस सेनेचे ६३ आमदार, मंत्री व काही खासदार उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेत आमदार अर्जुन खोतकर यांनी याबाबत
माहिती दिली.
मराठवाडय़ातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी एकाच दिवशी शासकीय यंत्रणेकडून विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेतली जाईल.
शिवसेनेने शिवजलक्रांती अभियानाच्या माध्यमातून जिल्हय़ात अनेक ठिकाणी जलसंधारणाची कामे केली आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतही शिवसेनेने केली. तूरडाळ भाववाढीचा प्रश्न सेनेच्या मंत्र्यांनी सर्वात आधी मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित केला होता. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्याचा सातबारा कोरा करावा, ही आमची आग्रही मागणी असल्याचे आमदार खोतकर यांनी सांगितले.
संग्रहित