Mahendra Dalvi On Raigad Guardian Minister : महायुती सरकारमधील रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते आग्रही आहेत. पण जेव्हा पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली होती, तेव्हा रायगडचं पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या आदिती तटकरे यांना तर नाशिकचं पालकमंत्री पद भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं होतं. मात्र, यानंतर दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थगिती दिली होती.
त्यानंतर हा तिढा अद्यापही सुटलेला नाही. यातच आता शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार महेंद्र दळवी यांनी महायुतीला एक सूचक इशारा दिला आहे. ‘आम्हाला पालकमंत्री पदासाठी शेवटची लढाई लढायची वेळ आली तरी चालेल. आम्ही ती लढाई लढणार’, असा इशारा महेंद्र दळवी यांनी दिला आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.
आमदार महेंद्र दळवी काय म्हणाले?
मंत्री भरत गोगावले यांची पालकमंत्री पदाची संधी हुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे, असा प्रश्न आमदार महेंद्र दळवी यांना विचारला असता ते म्हणाले, “शिवसैनिक आणि आमदार म्हणून खऱ्या अर्थाने भरत गोगावले यांच्या पालकमंत्री पदासाठी रायगडकरांना अपेक्षा आहे. आदिती तटकरे यांना पालकमंत्री म्हणून घोषित झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या निर्णयाला स्थगिती दिली. आता १ मे रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्या हस्ते होत आहे. आम्ही याला विरोध करणार आहोत”, असं आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटलं आहे.
“भरत गोगावले यांच्या रुपाने आम्हाला पालकमंत्री पद मिळालं पाहिजे. खरं तर भरत गोगावले यांनी त्याग केलेला आहे. आता त्यांच्याकडे मंत्रिपद आहे, त्यामुळे त्यांना पालकमंत्री पद मिळायला पाहिजे ही अपेक्षा आहे. त्यामुळे रायगडबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. खरं तर तटकरे कुटुंबाला संपूर्ण रायगडमधून विरोध आहे. आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती मिळालेली आहे, त्यामुळे आम्ही आशावादी आहोत”, असंही महेंद्र दळवी यांनी म्हटलं.
“रायगडने जो जनाधार दिला तो आम्हाला दिलेला आहे. त्यामुळे गोगावले पालकमंत्री व्हायला पाहिजेत. तटकरे कुटुंबाचा इतिहास पाहिला तर त्यांचं नेहमी सर्व आम्हालाच पाहिजे असं असतं. पण आम्ही यावेळी असं स्वीकारणार नाही, मग भलेही यासाठी शेवटची लढाई लढायची वेळ आली तरी चालेल. आम्ही ती लढाई लढणार”, असा इशारा महेंद्र दळवी यांनी दिला आहे.
महायुतीत शिवसेनेवर अन्याय होतोय का? असं विचारलं असता महेंद्र दळवी म्हणाले, “नाशिक आणि रायगडमध्ये फरक आहे. पण नेहमी तटकरे कुटुंबच का? भरत गोगावले हे सर्वसामान्य व्यक्ती आहेत, पण याचा फायदा कोणी घेत असेल तर रायगडची जनता हे सहन करणार नाही. आम्ही देखील अन्याय सहन करणार नाही. रायगड हा रस्त्यावर उतरणारा मावळा आहे. त्यामुळे आम्हाला काही फरक पडणार नाही. रायगड हा उठाव करणारा जिल्हा असल्यामुळे उठाव तर नक्की होणार”, असंही त्यांनी म्हटलं आहे.