देश सध्या रामभरोसे असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसंच विरोधकांकडून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करताना देशात सर्वाधिक चांगलं काम महाराष्ट्राने केलं असल्याचंही ते म्हणाले आहेत. अहंकार आणि राजकारण बाजूला ठेवून जर चर्चा केली तर देशातील परिस्थिती सुधारु शकते असा सल्लाही संजय राऊतांनी दिला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“या देशात सरकार, प्रशासन, प्रधानमंत्री, आरोग्यमंत्री आहेत. पण ज्याप्रकारे मृत्यू आहेत, गंगा नदीत हजारोंच्या संख्येने मृतदेह मिळत आहेत, हाहाकार माजला आहे ते पाहता देश रामभरोसे आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतही परिस्थिती वाईट आहे. तिथेही ऑक्सिजनअभावी लोक मरत आहेत. त्यामुळे पंतप्रधान, गृहमत्री, आरोग्यंत्री, सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अहंकार आणि राजकारण विसरुन एकमेकांशी चर्चा करत एकत्र काम केलं तरच देशातील स्थिती सुधारु शकते,” असंही ते म्हणाले आहेत.

“महाराष्ट्राने नेहमीच सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने हाताळल्या आहेत. पण विरोधक असो किंवा केंद्रातील कोणी असो महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. तरीही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात देशात सर्वात उत्तम काम महाराष्ट्रात झालं आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

पुढे त्यांनी सांगितलं की, “मी सातत्यानं सांगत आहे की, देशाला करोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी तर केंद्र सरकार, प्रधानमंत्री आणि देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी कोणताही अहंकार न बाळगता देशात महाराष्ट्र मॉडेल लागू केलं पाहिजे. यावर सर्वांचं एकमत झालं आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण आहेत, पण उत्तम प्रकारे नियंत्रण मिळवलं जात असून आरोग्य सुविधा पुरवण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली होत आहे. त्याचं कौतुक देश नाही तर जगभरात सुरु आहे. सगळीकडे महाराष्ट्राची पाठ थोपटली जात आहे”.

“प्रधानमंत्री, केंद्र सरकार जागेवरच आहे पण त्यांचं अस्तित्व दिसणं महत्त्वाचं आहे. अदृश्यपण काम करुन चालणार नाही. हा देश सध्या संकटाच्या काळात फक्त रामभरोसे पद्धतीने सुरु आहे. ज्या पद्धतीने गंगा, यमुनेत प्रेतांचा खच पडलेला आहे, मृतदेह वाहून येत किनाऱ्यावर लागली आहेत. त्यांच्यावर व्यवस्थित अंत्यसंस्कार ही करता येत नाही. हे असं याआधी देशात कधीच झालं नव्हतं,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

आणखी वाचा- जयंत पाटलांच्या नाराजीनंतर ठाकरे सरकारमध्ये फूट?; संजय राऊतांनी केलं मोठं विधान

सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टवर खर्च करण्यापेक्षा करोनासाठी पैसे वापरा
“देशातील प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधान यांना यासंदर्भात पत्र लिहिलं असून चिंता व्यक्त केली आहे. प्रोजेक्ट थांबवून करोनासाठी वापरण्यात यावा असं सांगितलं आहे. दिल्लीचा नकाशा बदलून काय करणार? लोक जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. तुम्ही लोकांची परिस्थिती पाहा. हीच गोष्ट उद्धव ठाकरेंपासून ते सोनिया गांधी सर्वांनीच सांगितलं आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

निवडणूक आयोग गुन्हेगार
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोदींनी प्रचार करण्याच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, “त्यासाठी निवडणूक आयोगाला जबाबदार ठरवलं पाहिजे. मला वाटतं निवडणूक आयोग या सर्वात मोठा गुन्हेगार आहे. आठ टप्प्यामध्ये निवडणूक खेचून घेऊन जाण्याची काहीच गरज नव्हती. त्यामुळे कोरोना संक्रमणाला ताकद मिळाली हे देशाचं दुर्भाग्य आहे”.

महाविकास आघाडीत फूट नाही
“कोणत्या मंत्र्याने काय सांगितलं मला माहिती नाही. जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ते राज्याचे ज्येष्ठ नेते असून, महाविकासआघाडी मधले महत्त्वाचे मंत्री, अनुभवी नेते आहेत. त्यांनी काल स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत खुलासा केला आहे. कॅबिनेट मध्ये काय घडलं याबाबत बाहेर सांगू शकत नाही. चर्चा झाली असेल काही. बाहेर कितीही कोणीही अफवा पसरविल्या तरी महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे, मजबूत आहे. कॅबिनेटमध्ये भांड्याला भांडे लागले असेल. पण आमची भांडी काचेची नाही ती फुटणार नाही किंवा त्याला तडा जाणार नाही,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीत फूट असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mp sanjay raut on coronavirus maharashtra central government sgy
First published on: 14-05-2021 at 10:23 IST