Sanjay Raut On Ajit Pawar : विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापलं असून महाराष्ट्रात सध्या सर्वच नेत्यांचे दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून विविध मतदारसंघाचा आढावा आणि उमेदवारांची चाचपणी करत निवडणुकीची रणनीती आखली जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दौऱ्यावेळी सभा आणि मेळाव्यांच्या माध्यमातून एक प्रकारे निवडणुकीचा प्रचारच सुरु असल्याचं बोललं जात आहे. याच अनुषंगाने आज महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळही फुटला आहे. महाविकास आघाडीमधील पक्षांचा संयुक्त मेळावा आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला.

या मेळाव्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करत जागावाटपाबाबत आणि आघाडीच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा केल्याचं सांगितलं जातं. या मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या ‘पिंक पॉलिटिक्स’ची चर्चा आहे. त्यांच्या पक्षाची गुलाबी रंग ही ओळख तयार करण्यात येत असून पक्षाच्या सभा, मेळावे आणि कार्यक्रमांमध्ये सर्वत्र गुलाबी रंग प्राधान्याने वापरण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून संजय राऊत यांनी अजित पवारांवर टोलेबाजी केली. “सुप्रिया सुळेंच्या लाडक्या भावाने रंग बदलला आहे. आता ते पिंक झालेत. सरडा रंग बदलतो. तसं ते अचानक गुलाबी झालेत”, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली.

हेही वाचा : Uddhav Thackeray : ‘मविआ’चा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरेंची घोषणा; म्हणाले, “माझा पाठिंबा…”

संजय राऊत काय म्हणाले?

“सुप्रिया सुळे यांचे जे लाडके भाऊ आहेत, त्यांनी रंग बदलला आहे. ते आता पिंक झाले आहेत. सरडा रंग बदलतो तसं ते अचानक गुलाबी झाले आहेत. आता हा पिंक सरडा बारामती सोडणार आहे, असंही मी ऐकलंय. कुठे जाणार मला माहीत नाही. मात्र, गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिना नाही. आपला भगवा रंग आहे. तेलंगणा राज्यात केसीआर यांचा रंग गुलाबी आहे, त्यांचा देखील पराभव झाला”, असा हल्लाबोल नाव न घेता संजय राऊतांनी अजित पवारांवर केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राऊत पुढे म्हणाले, “मी एकदा के चंद्रशेखर राव (केसीआर) यांना विचारलं की तुम्ही हा पिंक रंग कुठून आणला? हा रंग राजकारणात चालत नाही. तेव्हा ते मला म्हणाले, आमचा विजय नक्की होणार. त्यानंतर मी त्यांना म्हटलं. पिंक रंग कधीही जिंकणार नाही. एकतर भगवा जिंकेल किंवा तिरंगा जिंकेल”, असं म्हणत खासदार संजय राऊतांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली.