राज्याच्या ३२ जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपाने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला. मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या शिवसेनेची चौथ्या क्रमांकावर पीछेहाट झाली, तर सरकारमध्ये महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या राष्ट्रवादीने दुसरा क्रमांक पटकावून राज्यात पक्षाची ताकद वाढवली. काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर असला तरी विदर्भाने नेहमीप्रमाणे काँग्रेसला साथ दिली.
दापोलीत राष्ट्रवादीची सत्ता आली तर मंडणगड नगरपंचायतीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार निवडून न येता अपक्ष उभे राहिलेले शिवसेनेचे आठ उमेदवार निवडून आले. या निकालामुळे शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मुलाने नाराजी जाहीर करत मनातील सल बोलून दाखवली आहे. शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं अशी छुपी निती आमच्याच काही नेत्यांची होती असा गंभीर आरोप योगेश कदम यांनी केला आहे.
नगरपंचायतींमध्ये भाजपला सर्वाधिक जागा; राष्ट्रवादीला बळ, शिवसेना चौथ्या क्रमांकावर
शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं अशी छुपी निती आमच्याच काही नेत्यांची होती असा आरोप दापोली मंडणगडचे आमदार आणि रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.
“दापोलीच्या नगरपंचायतीत पाच वर्ष शिवसेनेची सत्ता होती. ती आता शिवसेनेकडे नसून राष्ट्रवादीकडे गेली आहे. फायदा कोणाचा तर राष्ट्रवादीचा झाला आहे. शिवसेनेचा फायदा झालेला नाही. जे शिवसेनेच्या एबी फॉर्मवर निवडून आले आहेत त्यापैकी सहापैकी चार राष्ट्रवादीचे लोक आहेत. ते शिवसैनिक नाहीत. म्हणजे एबी फॉर्म भरण्याच्या दोन मिनिटं आधी त्यांच्या गळ्यात पट्टे घालण्यात आले. हे निर्णय शिवसैनिकांनी मान्य केले नाहीत,” असं योगेश कदम यांनी सांगितलं आहे.
राष्ट्रवादी ठरला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष
भाजपाला राष्ट्रीय पातळीवर आव्हान देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असला तरी राष्ट्रवादीने ३४४ जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकाचे यश संपादन केले. विधानसभेपाठोपाठ नगरपंचायतींमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसला मागे टाकले आहे. राष्ट्रवादीला आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रात चांगले यश मिळायचे. नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा, कोकणात यश मिळाले आहे. प्रचाराच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस हा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आजच्या निकालावरून राष्ट्रवादी हा राज्यातील मोठा पक्ष असल्याचे सिद्ध झाले, असा चिमटा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीस यांनी उद्देशून काढला. सत्तेचा वापर करीत राष्ट्रवादीने पक्षाचा पाया विस्तारला. त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. विदर्भातही राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढले आहे. आर. आर. पाटील यांचे पूत्र रोहित यांच्या नेतृत्वाखाली कवठे-महाकांळमध्ये राष्ट्रवादीला सत्ता मिळाली. २३ वर्षीय रोहित पाटील यांना पहिल्याच प्रयत्नात चांगले यश मिळाले. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड या आपल्या मतदारसंघात वर्चस्व कायम राखले.
नगरपंचायतीतील एकूण जागा १६४९
भाजप – ३८४
राष्ट्रवादी – ३४४
काँग्रेस – ३१६
शिवसेना – २८४
मनसे – ४
अपक्ष – २०६
स्थानिक आघाड्या – ८२
बसपा – ४
माकप – ११