शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका केली. जलील यांनी औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामकरण करण्यास विरोध केला. याबाबत संजय शिरसाट यांना प्रश्न विचारलं असता त्यांनी “कोण इम्तियाज जलील? ते शहराचे बादशाह लागून गेले काय?” असा सवाल केला. ते बुधवारी (६ जुलै) औरंगाबाद शहरात परतले. यावेळी माध्यमांनी पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.

संजय शिरसाठ म्हणाले, “कोण इम्तियाज जलील, त्यांना मी नाही ओळखत नाही. इम्तियाज जलील शहराचे बादशाह आहेत का? या शहरातील जनता महत्वाची आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द आहे संभाजीनगर नाव होणारच आहे. संजय राऊत इतके दिवस प्रस्ताव दिला म्हणून खोटे बोलत असतील, पण आज हा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहे. हा ठराव उद्धव ठाकरेंनी दिला आहे आणि शंभर टक्के नामांतर होणार आहे.”

“कितीही लोक आडवे आले तरी त्यांना आडवं पाडण्याची ताकद”

“असे कितीही लोक आडवे आले तरी त्यांना आडवं पाडण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. संभाजीनगर होणार ही केवळ घोषणा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नामांतर करतीलच,” असं संजय शिरसाठ यांनी म्हटलं.

“उद्धव ठाकरे यांनी कोणाचेच ऐकले नाही”

“आता खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. त्यांचा आदेश आता आमच्यासाठी शेवटचा आदेश आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना पत्रही लिहिले होते आणि व्हिडीओच्या माध्यमातूनही त्यांना बोललो होतो. मात्र, उद्धव ठाकरे यांनी कोणाचेच ऐकले नाही. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामुळेच फुटली,” असा आरोप आमदार संजय शिरसाट यांनी केला.

“संजय राऊत हे शिवसेना संपवायला निघालेत”

आमदार संजय शिरसाट पुढे म्हणाले, “संजय राऊत यांच्यामुळे शिवसेना फुटली आणि जे कुणी शिवसेनेत उरले आहेत ते पण संजय राऊतांमुळे फुटतील. मातोश्रीची दारं बंद केली तर त्यांना श्वास घेणे मुश्किल होईल. त्यांना भावना गवळींना पदावरून काढण्याची काय गरज होती? हेच चालू आहे. त्यामुळे शिवसैनिक नाराज आहे. आज ईडी गवळींच्यामागे लागली म्हणून त्यांचं पद काढून घेतलं. या अशा प्रकारांमुळेच सर्व आमदार नाराज आहेत.”

हेही वाचा : “१८ पैकी १२ खासदार व २२ माजी आमदार आमच्यासोबत येणार”; गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावरती एखाद्या मंत्रीपदाची जबाबदारी दिली, तर मी ती पूर्ण जबाबदारीने सांभाळेन. प्रत्येक आमदाराचे मंत्री होण्याचे स्वप्न असते, माझे पण ते स्वप्न आहे,” असंही शिरसाट यांनी म्हटलं.