शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बुधवारी (२७ जुलै) जन्मदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशातच शिवसेनेतील बंडखोर गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी सामनावर आरोप केला आहे. बंडखोरांना उद्धव ठाकरेंना शुभेच्छा द्यायच्या होत्या. त्यासाठी सामनाकडे जाहिराती पाठवण्यात आल्या. मात्र, सामनाने बंडखोरांच्या जाहिराती नाकारल्या, असा आरोप राहुल शेवाळेंनी केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

राहुल शेवाळे म्हणाले, “आम्ही सर्वांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आम्ही दरवर्षी हा दिवस समाजोपयोगी काम करून आनंदाने साजरा करतो. याशिवाय दरवर्षी आम्ही सामनाला देखील जाहिरात देतो. मात्र, यावर्षी दुर्दैवाने आमच्या जाहिराती स्विकारण्यात आल्या नाही. असं असलं तरी आमच्या शुभेच्छा उद्धव ठाकरेंसोबत सदैव राहतील.”

“सामनाच्या कर्मचाऱ्यांनी या जाहिराती नाकारल्या”

“सामनात आमच्या जाहिराती नाकारताना कारणं सांगण्यात आली नाहीत. सामनाच्या कर्मचाऱ्यांनी या जाहिराती नाकारल्या. दरवर्षी सर्व खासदारांच्या सामनात जाहिराती असतात. त्याप्रमाणे याही वर्षी आम्ही जाहिराती पाठवल्या होत्या,” असं राहुल शेवाळे यांनी सांगितलं.

शुभेच्छा कोणाला? माजी मुख्यमंत्र्यांना की शिवसेना पक्षप्रमुखांना? राहुल शेवाळे म्हणाले…

राहुल शेवाळे यांना तुम्हाला उद्धव ठाकरेंना नेमक्या काय शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि माजी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा द्यायच्या होत्या की पक्षप्रमुखांना असाही प्रश्न विचारण्यात आला. यावर शेवाळेंनी त्यांचं जे जे पद आहे त्याला आमच्या शुभेच्छा आहे, असं म्हटलं. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्वीट करत शुभेच्छा देताना पक्षप्रमुख पदाचा उल्लेख न केल्याबद्दल विचारणा केली असता शेवाळे म्हणाले, “एकनाथ शिंदेंच्या शुभेच्छांवर मी काहीही बोलू शकत नाही. आम्ही दरवर्षी ज्या शुभेच्छा देतो त्या आम्ही दिल्या आहेत.”

हेही वाचा : Uddhav Thackeray Birthday: एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण चर्चा त्यांनी उल्लेख केलेल्या पदाची, म्हणाले “महाराष्ट्राचे…”

दरम्यान, बंडखोर शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या आरोपांवर सामनाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.