scorecardresearch

अजित पवारांनी संभाजीराजेंचा ‘धर्मवीर’ उल्लेख केल्यानंतर शिवसेनेने ‘सामना’तून मांडली भूमिका, म्हणाले “अण्णाजी पंतांचे समर्थक…”

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे तारतम्य बाळगणार आहेत काय? शिवसेनेची विचारणा

अजित पवारांनी संभाजीराजेंचा ‘धर्मवीर’ उल्लेख केल्यानंतर शिवसेनेने ‘सामना’तून मांडली भूमिका, म्हणाले “अण्णाजी पंतांचे समर्थक…”
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे तारतम्य बाळगणार आहेत काय? शिवसेनेची विचारणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर राज्यात अनेक ठिकाणी निदर्शन केली जात आहेत. भाजपा आणि शिंदे गटाकडून अजित पवारांना लक्ष्य केलं जात असताना शिवसेनेने ‘सामना’मध्ये अग्रलेखातून आपली भूमिका मांडली आहे. शिवसेनेने भाजपाला राज्यपालांच्या विधानाची आठवण करुन दिली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तारतम्य बाळगणार आहेत काय? अशी विचारणाही शिवसेनेने केली आहे.

“छत्रपती संभाजी महाराजांच्या राजकीय आर्थिक, धार्मिक धोरणांवर छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो. त्याच स्वराज्य रक्षणासाठी संभाजीराजांनी इतिहासातील सगळय़ात मोठा त्याग व बलिदान केले. एखादा तपस्वी व धर्मवीरच असे बलिदान करू शकतो. त्या धर्मवीराच्या महान पित्याचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज सत्तेवर आहेत, राजभवनात ठाण मांडून बसले आहेत. त्यांना पाठीशी घालणारे अण्णाजी पंतांचे समर्थक अजित पवारांना तारतम्य बाळगण्याचा सल्ला देतात हीच खरी गंमत आहे. आधी शिवराय अपमानप्रकरणी राज्यपालांना हटवण्याची मागणी करा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे तारतम्य बाळगणार आहेत काय?,” अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.

संभाजीराजेंचा ‘धर्मवीर’ उल्लेख केल्याने संतापलेल्या अजित पवारांना फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले “त्यांच्या विचारांच्या लोकांनी…”

अग्रलेखात काय आहे?

“अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरून भाजपने धुरळा उडवायला सुरुवात केली आहे. ‘‘छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्य रक्षक म्हणतो. ते धर्मवीर नव्हते. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचा कुठे पुरस्कार केला नाही.’’ असे विधान अजित पवार यांनी करताच भाजपपुरस्कृत धुळवड संघटनांनी गदारोळ सुरू केला. संभाजीराजांचे बलिदान हे धर्मासाठीच होते याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही, पण छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केले त्या स्वराज्य रक्षणासाठीही छत्रपती संभाजीराजेंनी त्याग आणि बलिदान केले,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“अजित पवार म्हणतात, ‘‘छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक होते. धर्मवीर नव्हते.’’ आम्ही म्हणतो, खरा धर्मवीरच स्वराज्याचा रक्षक असतो. तेव्हा त्यात उगाच श्लेष काढून कोणाला छाती पिटण्याची गरज नाही. मात्र यावरून उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली आहे. अजित पवारांनी तारतम्य बाळगावे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तारतम्याची भाषा मुख्यमंत्री शिंदे यांनी करावी हे आश्चर्यच आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा अपमान राज्यपाल कोश्यारी व भाजपच्या अनेक पुढाऱ्यांनी केला तेव्हा ‘‘राज्यपाल, तारतम्य बाळगा!’’ असे सांगण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांना झाली नाही. कुणी शिवरायांना ‘माफीवीर’ म्हणाले, तर कुणी ‘इतिहासातील जुने नेते’ म्हणून शिवरायांची चेष्टा केली. हे काय तारतम्यास धरून होते?,” अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.

आणखी वाचा – “आमच्या सहनशीलतेचा अंत झाला तर…”, शिंदे गटाचा अजित पवारांना इशारा; शंभूराज देसाई म्हणतात…

“राज्यपालांनी शिवरायांचा अपमान करूनही ते राजभवनाची हवा खात बसले आहेत. राज्यपालांविरुद्ध राज्यात संतापाचा उद्रेक झाला, महाविकास आघाडीने विराट मोर्चा काढला. यावर कोणतेही तारतम्य न बाळगता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘हा नॅनो मोर्चा आहे’ अशी त्याची संभावना केली. वास्तविक, हा मोर्चा शिवरायांच्या अपमानाविरुद्ध होता याचे तारतम्य तरी फडणवीस यांनी बाळगायला हवे होते,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“शिवराय हेसुद्धा हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणजे धर्मवीरच होते व त्यांचाच वारसा त्यांच्याच छाव्याने म्हणजे संभाजीराजांनी पुढे चालवला. प्रश्न इतकाच आहे की, शिवरायांच्या अपमानावर शेपूट घालून बसणारे संभाजीराजांच्या निमित्ताने तारतम्याची भाषा करू लागले आहेत. या मंडळींना संभाजीराजे कळलेच नाहीत,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.

आणखी वाचा – “जितेंद्र आव्हाडांनी आता औरंगजेबाचं मंदिर उभारावं आणि उद्घाटनाला अजित पवार…” नरेश म्हस्केंचा खोचक सल्ला

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

विधानसभेत बोलत असताना अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणई घातलं जात नाही. बाल शौर्य पुस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर… धर्मवीर… उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा”, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 08:42 IST

संबंधित बातम्या