गोबेल्सला सुद्धा लाज वाटावी अशा प्रकारची यंत्रणा राबवली जात आहे अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. राजकारणात आरोप होत असतात पण त्यासाठी काही मर्यादा पाळायला हव्यात. सरकारने यासाठी आता रणनीती आखण्याची गरज आहे असं मत संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार भेटीवरही प्रतिक्रिया दिली आहे. तसंच विधानसभा अध्यक्ष निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचे संकेत दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

“मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या भेटीतून वेगळे अर्थ काढण्याची काही गरज नाही. शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमधील बैठक चांगली झाली. यावेळी रणनीतीवर चर्चा झाली असावी. विरोधी पक्षाकडून ज्या पद्धतीने हल्ले सुरु आहेत त्यातील अनेक हल्ले फुसके बार आहेत. पण एकत्रितपणे त्याचा प्रतिकार करणं गरजेचं आहे. जो भ्रम निर्माण केला जात आहे, आरोप केले जात आहेत त्यांना त्याच ताकदीने उत्तर देण्याची गरज मला वाटते. त्यासाठी मुंबईला गेल्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना भेटून काय करायचं हे ठरवणार आहे,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

सरकारने रणनीती आखण्याची गरज

“एकतर्फी हल्ले होत असून चुकीचे आरोप केले जात आहेत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असून प्रसारमाध्यमांचा वापर केला जात आहे. खोट्या आणि बनावट गोष्टीसुद्धा खऱ्या म्हणून समोर आणल्या जात आहेत. गोबेल्सलाही लाज वाटावी अशा प्रकारची यंत्रणा राबवली जात आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. “राजकारणात आरोप होत असतात पण त्यासाठी काही मर्यादा पाळायला हव्यात. आणि त्यासाठी सरकारने रणनीती आखण्याची गरज आहे,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.

एक पाऊल पुढे टाकावं लागेल

“महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या हातात केंद्रीय तपास यंत्रणा हे एकमेव हत्यार आहे. आरोप खोटे, बनावट असतील तर त्याचा तपास करण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा मजबूत आणि निष्पक्ष आहे. केंद्रात भाजपाचं सरकार असल्याने केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्रातील मंत्री, आमदारांना त्रास देणं हीच एक ताकद त्यांच्या हातात आहे. कितीही खोटं करण्याचा प्रयत्न केला तरी उघड होतंच. असत्य तरंगून शेवटी वर येतं. या सर्वांशी लढण्यासाठी आता एक पाऊल पुढे टाकावं लागेल,” असा निर्धारच संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

घोटाळय़ांवर केवळ नाराजी व्यक्त करणे हे राज्याचे नुकसान करणारे

“शिवसेनेला दिलेला शब्द जर त्यावेळी भाजपाने पाळला असता तर कदाचित उद्धव ठाकरेंना अशा प्रकारचा निर्णय घेण्याची वेळ आली नसती हे आम्ही वारंवार सांगत आहोत. त्याबद्दल खंत किंवा खेद वाटण्याचं कारण नाही. आम्ही तिघांनी मिळून आता मार्ग स्वीकारला असून व्यवस्था तयार केली आहे आणि ती पुढे नेणं कटिबद्धता आहे,” असं यावेळी ते म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने करण्याच्या मागणीसंबंधी बोलताना ते म्हणाले की, “सरकार जेव्हा सत्तेत आलं तेव्हा १७० चं बहुमत होते. दुर्दैवाने दोन आमदार आमचे कमी झाले आहेत. तरीही आमचा १७० चा आकडा कायम राहील याची खात्री आहे. पूर्ण बहुमत असताना आवाजी मतदान झालं तरी त्यासाठी घटनात्मक तरतूद आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या निवडणुका सर्वत्र झाल्या आहेत”.

चंद्रकांत पाटलांच्या पत्रावर प्रतिक्रिया

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “चंद्रकात पाटील फार चांगल्या प्रकारे पत्र लिहितात. पण त्यात काही चुका आहेत. पत्रकार असल्याने मला त्या जाणवल्या. त्यामुळे कोर्टात त्यांचं पत्र फेटाळलं जाऊ शकतं”.

“चंद्रकातं पाटील हे अत्यंत विद्वान आहेत. महाराष्ट्रात त्याच्याइतका विद्रान राजकारणी मी गेल्या काही दिवसांत पाहिलेला नाही. चंद्रकांत पाटील हे अगदी निष्पाप, निरागस आहेत, लहान मुलासारखे आहेत. त्यामुळे आपण सहजतेने घेतलं पाहिजे. विरोधी पक्षाने त्यांचं काम करत राहावं, आम्ही आमचं काम करत राहू,” असंही ते म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut on ncp sharad pawar maharashtra cm uddhav thackeray bjp sgy
First published on: 01-07-2021 at 11:03 IST