शनिवारी पहाटेपर्यंत सुरू असलेल्या घडामोडींनंतर अखेर राज्यसभा निवडणुकीच्या सहा जागांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये भाजपाच्या तीन तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रत्येकी एक जागा निवडून आली आहे. सहाव्या उमेदवारासाठी शिवसेनेनं जोरदार प्रयत्न केले असले, तरी महाविकास आघाडीकडच्या काही अपक्षांची मतं फुटली आणि शिवसेनेचे संजय पवार यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्याचवेळी भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे.

“एकदाचा घोडेबाजार करून टाका”

सुहास कांदेंचं मत बाद का झालं, हा संशोधनाचा विषय असल्याचं संजय राऊत म्हणाले. “नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या मतांचा विचारच करत नाही. सुहास कांदेंचं मत का बाद केलं? हा संशोधनाचा विषय आहे. आम्ही त्याच कारणासाठी मुनगंटीवारांच्या मताला आक्षेप घेतला होता. मतदानावेळी धार्मिक प्रदर्शन करायचं नसतं हे माहिती असूनही अमरावतीचे एक शहाणे जे उद्योग करत होते, ते आक्षेपार्ह होतं. त्यांचंही मत घटनेनुसार बाद व्हायला हवं. पण फक्त आमचं मत बाद करून रात्री उशीरा आणि पहाटे काही गोष्टी करण्यात आल्या. यांना पापकृत्य करण्याची पहाटेची फार सवय आहे. पहाटेपर्यंत त्यांचा हा उपक्रम सुरू होता. त्या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही असेच उपक्रम करत राहा. महाराष्ट्राचा एकदा कायमचा घोडेबाजार करून टाका”, असं राऊत यावेळी म्हणाले.

“आमचा एक उमेदवार विजयी झाला नाही याचा अर्थ…”

“राज्यसभा निवडणुकीची प्रक्रिया फारच किचकट आहे. ज्या कारणासाठी आमचं शिवसेनेचं एक मत बाद केलं, तसाच आक्षेप आम्ही भाजपाच्या मतांवर घेतला होता. पण निवडणूक आयोगानं त्यांचं मत बाद केली नाही. पण नक्की कोणाला पडणारं मत बाद झालं हे शोधण्यासाठी ७ तास घेतले. केंद्रीय यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली कसं काम करतायत? हे आम्ही डोळ्यांनी पाहात होतो. कुठे ईडी, कुठे सीबीआय, कुठे अशा प्रकारे निवडणूक यंत्रणा वापरल्या जातात का? अशी शंका येते. आमचा एक उमेदवार विजयी होऊ शकला नाही. पण याचा अर्थ समोरच्यांनी दैदिप्यमान विजय मिळवला असा नाही”, असं राऊत म्हणाले.

“आमची एक जागा भाजपानं जिंकली. पण पहिल्या क्रमांकाची ३३ मतं आम्हाला तर २७ मतं भाजपाच्या उमेदवाराला मिळाली आहे. पण निवडणूक प्रक्रिया तशी आहे. दुसऱ्या-तिसऱ्या पसंतीच्या गणितावरून जय-विजय ठरत असतात”, असं राऊत म्हणाले.

“घोड्यांना बोली जास्त लागली वाटतं”

दरम्यान, या निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. “बाजारातले काही घोडे विकले गेले. मला वाटतंय जास्त बोली लागली. किंवा इतर काही कारणं असतील. त्यामुळे आमची अपक्षांची ६ मतं आम्हाला मिळाली नाहीत. असे लोक कुणाचेच नसतात. पण आमचे घटक पक्ष, छोटे पक्ष यांचं एकही मत फुटलं नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बच्चू कडू, शंकरराव गडाख, यड्रावकर किंवा इतर अशी मतं आम्हाला मिळाली आहेत. फक्त घोडेबाजारात जे लोक उभे होते, त्यांची ६-७ मतं आम्हाला मिळवू शकलो नाही. आम्ही व्यापार न करताही संजय पवारांना पहिल्या पसंतीची ३३ मतं मिळाली हाही आमचा विजयच आहे”, असं राऊत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी केली, त्यांची नावं आमच्याकडे आहेत. आम्हाला माहितीये कुणी आम्हाला मतं दिलेली नाहीत. ठीक आहे. पाहुयात”, अशा शब्दांत संजय राऊतांनी सूचक इशारा देखील दिला आहे.