Shivsena Split : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काही दिवसांपूर्वी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली होती. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी याबाबत भाष्य केलं आहे. तसंच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात का? यावरही उत्तर दिलं आहे.
२०२२ मध्ये शिवसेनेतली सर्वात मोठी फूट
जून २०२२ मध्ये शिवसेनेत सर्वात मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे ४० आमदारांना घेऊन बाहेर पडले आणि त्यांनी थेट शिवसेना नेतृत्वाला म्हणजेच उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार हे उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे पडलं. पुढची अडीच वर्षे एकनाथ शिंदे भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होते. दरम्यान मागच्याच आठवड्यात अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ सोहळा विधान परिषदेच्या प्रांगणात पार पडला. त्यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांच्या समोर पहिल्यांदा आले होते. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडे पाहिलंही नाही. मात्र त्या फोटोची चर्चा झाली. कारण एका बाजूला उद्धव ठाकरे मधे नीलम गोऱ्हे आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे असा तो फोटो होतो. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत संजय शिरसाट यांनी आता भाष्य केलं आहे.
आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत फूट पडू नये म्हणून प्रयत्न केले-संजय शिरसाट
आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले, पण त्यांनी (उद्धव ठाकरे) ऐकलं नाही. उद्धव ठाकरेंना अनेक लोकांनी मिसगाईड केलं. आम्हाला जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी तिकिट दिलं तेव्हा अनेक दिग्गज रांगेत होते. बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं माझ्याबाबतीत सांगितलं होतं संजयच उमेदवार असेल. असं सांगणारा नेता होता तेव्हा. आता नेमकं पक्षप्रमुख कोण आहे? तेच कळत नाही. तिकडचे आमदार आहेत त्यांना जरा विचारा की त्यांची अवस्था काय आहे? ते सांगतील तु्म्हाला. असं संजय शिरसाट म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील का?
दोन्ही शिवसेना एकत्र येतील का? असं विचारलं असता शिरसाट म्हणाले, “अंबादास दानवे आठवीत होता तेव्हापासून तो मला पाहतोय. आमची छत्रपती संभाजी नगरमध्ये प्रचंड एकी होती. अंबादास मला बराच ज्युनिअर आहे. पण त्याने जे सांगितलं की आम्ही एका ताटात जेवायचो ते खरंच आहे. आता तो सांगत असेल की दोन शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत तर त्याने तसं उद्धव ठाकरेंना सांगावं. आता राज ठाकरेंसह ते एकत्र आले आहेत. दोन भाऊ एकत्र आले आहेत याचा आम्हाला आनंद आहे. बाकी काही भाष्य मी करणार नाही. कारण उद्या त्यांची युती होईल की नाही माहीत नाही. महाविकास आघाडीचं काय होईल ते माहीत नाही. राज ठाकरे काँग्रेसचा प्रचार करतील का ते पण माहीत नाही. तसंच दोन शिवसेना एकत्र येतील का? यावर आजच भाष्य करणं योग्य होणार नाही. संधी पाहून राजकारण हे काही आज होत नाही. आपल्या महाराष्ट्रात ती परंपराच आहे. शरद पवारांनी किती संधी साधल्या, त्यांना कुणी बोललं का? प्रत्येक पक्षात इनकमिंग आऊटगोईंग असतंच. हे खरं तर न थांबणारं चक्र आहे. आमचंही उद्या काय होईल हे एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात त्यावर अवलंबून असेल.” असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात त्यांनी हे भाष्य केलं आहे.