पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर राष्ट्रीय स्तरावर भाजपाविरोधी आघाडी उभी करण्याच्या चर्चांना वेग आला आहे. शरद पवार यांनीही त्याला दुजोरा दिल्यामुळे प्रत्यक्ष आणि पडद्यामागे घडामोडी सुरू झाल्याचं चित्र दिसून येत आहे. मात्र, शिवसेनेकडून यावर तीव्र शब्दांमध्ये आक्षेप घेण्यात आला आहे. “देशात काँग्रसच्या नेतृत्वाखाली यूपीए आहेच कुठ? असा सवाल ममता बॅनर्जींनी विचारला. यूपीए नाही तसा एनडीएही नाही. मोदींच्या पक्षाला एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे, यूपीए समांतर दुसरी आघाडी स्थापन करणे हे भाजपाचे हात बळकट करण्यासारखेच आहे”, अशा शब्दांत शिवसेनेनं निशाणा साधला आहे.

…आधी पर्याय तर उभा करा!

दरम्यान, विरोधकांच्या आघाडीचं नेतृत्व कुणी करावं, यावरून सुरू असलेल्या वादावर शिवसेनेनं सामनामधील अग्रलेखातून तोंडसुख घेतलं आहे. “काँग्रेसला विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याचा दैवी अधिकार प्राप्त झालेला नाही, असं ऐतिहासिक विधान तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत किशोर करतात. दैवी अधिकार कुणालाच प्राप्त होत नाही. यूपीए नेतृत्वाचा दैवी अधिकार कुणाचा ते येणारा काळच ठरवेल. आधी पर्याय तर उभा करा”, अशा शब्दांत शिवसेनेनं विरोधकांना ऐकवलं आहे.

“हा सगळ्यात गंभीर धोका”

“मोदी व त्यांच्या प्रवृत्तीविरुद्ध लढणाऱयांनाही काँग्रेस संपावी असे वाटणे हा सगळ्यात गंभीर धोका आहे. काँग्रेस पक्षाची गेल्या दहा वर्षांतील घसरण चिंताजनक आहे याबाबत दुमत नाही. तरीही उताराला लागलेली ही गाडी पुन्हा वर चढूच द्यायची नाही व काँग्रेसची जागा आपण घ्यायची हे मनसुबे घातक आहेत”, अशी भिती शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

भाजपाविरोधी राष्ट्रीय आघाडीत काँग्रेस असेल का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…!

“नेतृत्व कुणी करावं हा पुढचा प्रश्न, पण..”

“ममता बॅनर्जी यांच्या मुंबई भेटीनंतर विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. निदान शब्दांचे हवाबाण तरी सुटत आहेत. भारतीय जनता पक्षासमोर समर्थ पर्याय उभा करायला हवा यावर एकमत आहेच. पण कोणी कोणाला बरोबर घ्यायचे किंवा वगळायचे यावर विरोधकांत अखंड खल सुरू आहे. विरोधकांतच ऐक्याचा किमान समान कार्यक्रम तयार होणार नसेल तर भाजपास समर्थ पर्याय देण्याच्या बाता कोणी करू नयेत. आपापली राज्ये व पडक्या, मोडक्या गढय़ा सांभाळीत बसावे की एकत्र यावे यावर तरी किमान एकमत होणे गरजेचे आहे. त्या ऐक्याचे नेतृत्व कोणी करावे तो पुढचा प्रश्न”, असं देखील अग्रलेखातून शिवसेनेनं सुनावलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे विरोधकांचे काम..

दरम्यान, सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणं हे विरोधकांचं काम असल्याची भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. “२०२४ साली कुणाचे दैवे फळफळेल ते सांगता येत नाही. १९७८ साली जनता पक्षाच्या क्रांतिकारक विजयानंतर इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर कधीच येणार नाहीत, असा जोश लोकांत होता. भाजपाचा जन्म कायम विरोधी बाकांवर बसण्यासाठी झालाय अशी टवाळकी पचवून हा पक्ष अवकाशात झेपावला. आज राहुल गांधी, प्रियांका गांधींची राजकीय कुचाळकी सुरू आहे. ते अशा कुचाळक्यांना तोंड देत संघर्ष करत आहेत. प्रियांका लखीमपूर खिरीत पोहोचल्या नसत्या, तर शेतकऱ्यांच्या खुनाचे प्रकरण रफादफा झाले असते. हेच विरोधकांचे काम आहे”, असं सामनामधील अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.