केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे मंगळवारी ( २४ ऑक्टोबर ) तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर त्यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यात निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचं कारण स्पष्ट केलं आहे. निलेश राणे यांनी अशाप्रकारे तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानं अनेकांना धक्का बसला आहे.

“मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे. आता राजकरणात मन रमत नाही. इतर काही कारण नाही,” असं निलेश राणेंनी म्हटलं आहे. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हेही वाचा : “बाटगा मोठ्यानं बांग देतो, तशीच बॅनरबाजी”, राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला शिंदे गटातील नेते प्रत्युत्तर देत म्हणाले…

“दसऱ्याच्या मुहूर्तावर राजकारणातून निवृत्ती का घेतली? याबाबत अधिक मला काय माहिती नाही. पण, कदाचित राजकीय कुरघोडीतून निलेश राणेंना नैराश्य आलं असेल. त्यातून हा निर्णय घेतला असावा. राजकारणात कधी यायचं आणि कधी निवृत्त व्हायचं, हा प्रत्येकाचा अधिकार असतो,” असं विनायक राऊतांनी सांगितलं.

“दोन वेळा झालेल्या पराभवानंतर लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय निलेश राणेंनी घेतल्याची माहिती मला मिळाली,” असेही विनायक राऊत म्हणाले.

निलेश राणेंचं ट्वीट काय?

“नमस्कार, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. भाजपामध्ये खूप प्रेम भेटलं. भाजपासारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खूप नशीबवान आहे,” असं निलेश राणेंनी म्हटलं.

हेही वाचा : “शिवसेना तोडली, राष्ट्रवादी पक्षही फोडला अन् मिंध्या-लाचार…”, ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी एक लहान माणूस आहे. पण, राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र!”, असेही निलेश राणे म्हणाले.