अहिल्यानगर : महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिसांनी शिवसेनेचे ठाकरे गट शहरप्रमुख किरण काळे यांना अटक केली. त्यांना २५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज, मंगळवारी दिला आहे. दरम्यान, किरण काळे यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी महापालिकेतील ३०० कोटी रुपयांच्या रस्ते घोटाळ्याच्या तक्रारी करून पाठपुरावा केल्यानेच स्थानिक लोकप्रतिनिधी व मनपातील अधिकाऱ्यांनी संगनमताने खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केला आहे.
एका २१ वर्षीय विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार किरण काळे यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही घटना सन २०२३ ते एप्रिल २०२४ दरम्यान घडली. पतीपासून होत असलेल्या त्रासात मदत करण्याचे आमिष दाखवून काळे यांनी अत्याचार केल्याची तक्रार आहे. काळे यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने २५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली. या गुन्ह्यामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई होणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी सांगितले.
ठाकरे गटाचा आरोप
दरम्यान, ठाकरे गटाचे पदाधिकारी विक्रम राठोड, गिरीश जाधव, अंबादास शिंदे, दिलदार सिंग बीर, मुन्ना भिंगारदिवे, विशाल गायकवाड, चंद्रकांत उजागरे, जिग्नेश जग्गड, स्नेहल काळे, वर्षा जगताप, उषा वाखोरे, मनीषा काळे, विलास उबाळे यांच्या शिष्टमंडळाने पोलीस उपअधीक्षक भारती यांची भेट घेऊन निवेदन दिले. मनपातील रस्ते घोटाळ्याची सखोल चौकशी करावी तसेच यापूर्वीही काळे यांच्यासह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. आताही किरण काळे यांनी रस्ते घोटाळ्याचा पाठपुरावा सुरू करताच त्यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याने रस्ते घोटाळ्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.