Shivsena UBT on Raj and Uddhav Thackeray Alliance : राज्य सरकारने महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषा शिकणं सक्तीचं केल्यानंतर त्याविरोधात मराठी जनता एकवटू लागली आहे. राज ठाकरेंची मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही (उबाठा) राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठीच्य मुद्द्यावर हे दोन्ही पक्ष एकाच बाजूला आहेत. अशातच, महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे व शिवसेना (उबाठा) युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. मराठी माणसांच्या अस्तित्त्वासाठी आमच्यातील वाद किरकोळ असल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे. पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांना प्रतिसाद देत आपणही किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार असल्याची भूमिका घेतली आहे.
राज व उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेदरम्यान, शिवसेनेने (उबाठा) राज यांच्याविषयीची भूमिका स्पष्ट केली आहे. या पक्षाने त्यांच्या ‘सामना’ या मुखपत्रात राज यांच्याविषयी भरभरून लिहिलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
‘सामना’मध्ये म्हटलं आहे की “राज आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी एकत्र येण्यास तयार आहेत या बातमीने देशाच्या राजकारणात खळबळ माजली आहे. या बातमीने अनेकांना आनंद झाला तसे अनेक जण पोटदुखीने बेजार झाले. राज ठाकरे यांचे आतापर्यंतचे राजकारण नागमोडी पद्धतीचेच होते व ते फारसे यशस्वी झाले नाही. शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी ‘मनसे’ या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. त्या वेळी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना लोकांचे बऱ्यापैकी समर्थन मिळाले, पण पुढे त्यांच्या पक्षाला ओहोटी लागली. भारतीय जनता पक्ष, ‘एसंशिं’ (एकनाथ शिंदे) वगैरे लोक ‘राज’ यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेवर हल्ले करीत राहिले. यात राज यांच्या पक्षाचा राजकीय लाभ झाला नाही, पण मराठी एकजुटीचे अतोनात नुकसान झाले.”
राज यांनी मिंधे व भाजपाला दूर ठेवावं : शिवसेना (उबाठा)
“मोदी व शाह यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका ही राज यांची भूमिका होती. शाह-मोदी हे महाराष्ट्र हिताचा विचार करत नाहीत अशी राज यांची भूमिका होती. त्या भूमिकेला ते चिकटून राहिले नाहीत. भाजपाचे हिंदुत्व नकली व तकलादू आहे. या नकली हिंदुत्वाच्या जाळ्यात भाजपाने राज यांना अडकवले व गाडे घसरत गेले. आता त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले की, ‘‘झाले ते झाले, कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडण किरकोळ आहे. महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणे, एकत्र राहणे या मला फार कठीण गोष्टी वाटत नाहीत. विषय फक्त इच्छेचा आहे.’’ राज ज्यास आमच्यातील वाद म्हणतात ते उद्धव ठाकरे यांच्याबाबत आहेत. हे वाद कसले? ते कधीच बाहेर आले नाहीत. राज मराठी माणसांविषयी बोलत राहिले व शिवसेनेचा जन्मच मराठी हितासाठी झाला आणि ते हित उद्धव ठाकरे यांनी सोडले नाही. मग वाद कसले? राज यांच्या वतीने भाजप, मिंधे वगैरे लोकच बोलू लागले व तसे बोलण्याचे काहीच कारण नव्हते. या लोकांनी वाद सुरू केले. त्यामुळे भाजप, मिंधे या लोकांना दूर ठेवले तर वाद राहतोच कोठे? एकत्र येण्यासाठी इच्छा हवी,” असं मत ‘सामना’तून व्यक्त करण्यात आलं आहे.
आमच्या माफक अपेक्षेला कोणीही अट किंवा शर्त म्हणू नये : शिवसेना (उबाठा)
शिवसेनेने (उबाठा) म्हटलं आहे की “राज म्हणतात ते खरे आहे, पण कोणाच्या इच्छेविषयी ते बोलत आहेत? राज यांनी त्यांची इच्छा व्यक्त करताच उद्धव ठाकरेही मागे राहिले नाहीत व महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी त्यांनीही दमदारपणे एक पाऊल पुढे टाकले. काही किरकोळ वाद असलाच तर तो बाजूला ठेवून मीसुद्धा महाराष्ट्र हितासाठी एकत्र काम करायला तयार असल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. ही महाराष्ट्राच्या लोकभावनेची फुंकलेली तुतारी आहे. मराठी माणसाचा स्वाभिमान व महाराष्ट्राचे कल्याण यापुढे मतभेद वगैरे शून्य आहेत, पण राज यांनी महाराष्ट्राच्या शत्रूंच्या पंगतीला यापुढे बसू नये व महाराष्ट्रद्रोह्यांना घराच्या उंबरठ्याबाहेरच ठेवावे ही माफक अपेक्षा उद्धव यांनी व्यक्त केली असेल तर त्यास कोणी अट किंवा शर्त मानू नये.”
शिवसेनेचा (उबाठा) राज ठाकरेंना प्रश्न
सामनात म्हटलंय की “महाराष्ट्राच्या शत्रूंना घरात थारा देऊ नये असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यामागे एक वेदना आहे. अमित शाह, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे वगैरे लोकांनी महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर वार केले. याच शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरे यांचाही जन्म झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या आईशी बेइमानी करणाऱ्यांना पंगतीला बसवून महाराष्ट्र हिताची बात एकत्र येऊन कशी पुढे नेणार? हा साधा सरळ प्रश्न आहे.