गेल्या काही दिवसांपासून राज्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना खालची पातळी गाठली गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. यावरून पुन्हा एकमेकांवर आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापल्याचं दिसत असताना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर, अर्थात एकनाथ शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होत असल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी टिळकांच्या एका विधानाचाही संदर्भ दिला.

“दिवाळीत फटाके वाजतात. तसे हे वाजतायत. काही लवंगी असतात, काही बार असतात.सोडून द्यायचं. उद्धव ठाकरेंचं मला खरंच आश्चर्य वाटतं. जेव्हा हे सगळं सुरू झालं, जेव्हा कोर्ट-कचेऱ्या सुरू झाल्या तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य होतं की, ‘देशातली लोकशाही जिवंत राहील की नाही हा प्रश्न आहे’. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर रोज घाव घातला जातोय. अभिव्यक्ती स्वातंत्र, लेखनाचं स्वातंत्र्य आहे. त्याचा आम्ही वापर करत असू, तर त्यात गैर काय केलं हे सांगता आलं पाहिजे”, असं अरविंद सावंत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

“सध्या ‘चुन चुन के केस दाखिल करेंगे’ असं चालू आहे”

“पूर्वी लोकमान्य टिळक म्हणाले होते की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? इंग्रजांच्या विरोधात. आत्ता तसं काही म्हटलं तर ताबडतोब देशद्रोह होईल. ज्या पद्धतीने गुन्हे दाखल होतायत, ते पाहाता व्यंगचित्रकार, नकलाकार जन्माला आलेच नसते. जाणीवपूर्वक शिवसेनेच्या लोकांवर ‘चुन चुन के केस दाखिल करेंगे’, असं सध्या चालू आहे. त्यांना वाटतंय की आम्ही दबावात येऊन एक तर त्यांच्या गटात जाऊ किंवा गप्प बसू. त्यांनी अजून ओळखलं नाहीये. शिवसेनेचा चेंडू जितका जोरात आपटाल, तेवढा तो जोरात उसळून वर येतो. त्यामुळे या सगळ्याचं आम्हाला भय वाटत नाही”, असंही अरविंद सावंत म्हणाले.

चिपळूणमध्ये बोलताना भास्कर जाधवांना अश्रू अनावर; म्हणाले, “माझ्या पाठिशी…!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीबीआयबाबतच्या निर्णयावरही तोंडसुख

महाराष्ट्रात सीबीआयला थेट तपासाची परवानगी देत शिंदे सरकारने ठाकरे सरकारचा निर्णय फिरवला. याबाबत बोलताना सावंत यांनी राज्य सरकारवर तोंडसुख घेतलं. “सीबीआयला अनेक राज्यांनी दार बंद केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानंच तेव्हा म्हटलं होतं की सीबीआय म्हणजे सरकारचा पिंजऱ्यातला पोपट आहे. ईडी, निवडणूक आयोग हे सगळे पोपटच आहेत. केंद्रातली दोन माणसं या पिंजऱ्यातल्या पोपटांना खाऊ घालतात, दम देतात, भय घालतात. या यंत्रणांमधल्या अधिकाऱ्यांच्या मनालाही हे पटतं की नाही, असा मला प्रश्न पडतो”, असं सावंत यावेळी म्हणाले.